Cancer warning signs saam tv
लाईफस्टाईल

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Early cancer detection: कॅन्सरची लक्षणे लवकर ओळखणे महत्त्वाचे आहे. स्तन, त्वचा, तोंड, लिम्फ नोड्स आणि अंडकोषांची स्वतः तपासणी करताना कोणते बदल लक्षात घ्यावेत, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर हा गंभीर आजार असून याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. मात्र अनेक वेळा शरीरात काही बदल जाणवत असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत आजार पुढच्या टप्प्यात गेलेला असतो. भारतासारख्या देशात ही समस्या अधिक गंभीर आहे.

2022 मध्ये The Lancet Oncologyमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, ज्यामध्ये भारताचा काही प्रमाणात समावेश होतो तिथे स्तनाच्या कॅन्सरच्या 60 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये आजाराचं निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर होतं. यामागे केवळ वैद्यकीय सुविधांचा अभाव कारणीभूत नसतो. अनेकदा शरीरात झालेला बदल लक्षात येणं आणि डॉक्टरांकडे जाणं यामध्ये होणारा उशीरही असतो.

घरच्या घरी स्वतःची तपासणी करणं ही डॉक्टरांकडून केली जाणारी तपासणी किंवा नियमित स्क्रीनिंगचा पर्याय नाही. मात्र शरीरात झालेला एखादा बदल लक्षात येण्यापासून तो डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देण्यापर्यंतचा वेळ कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं. घरच्या घरी करता येणाऱ्या खालील पाच तपासण्यांमुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारे बदल लवकर लक्षात येऊ शकतात.

स्तनांची स्वतः तपासणी कशी कराल?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) 20 वर्षांवरील महिलांना दर महिन्याला स्तनांची स्वतः तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. ही तपासणी करण्यासाठी पाठीवर झोपा. उजव्या खांद्याखाली छोटी उशी ठेवा. त्यानंतर मधल्या तीन बोटांच्या टोकांनी स्तनावर हळूहळू गोलाकार पद्धतीने हात फिरवा. बगलपासून छातीच्या मधल्या हाडापर्यंत आणि वरून खाली अशा प्रकारे संपूर्ण स्तन तपासा.

तपासणी करताना तीन प्रकारचा दाब द्या हलका, मध्यम आणि थोडा अधिक. प्रत्येक भाग तपासल्यानंतर उभं राहूनही हीच तपासणी करा. त्यावेळी हात वर उचलून स्तनांच्या त्वचेतील बदल नीट पाहा.

कोणते बदल लक्षात घ्यायचे?

  • मागील महिन्यात नसलेली नवीन गाठ जाणवणं

  • त्वचेवर सुरकुत्या दिसणं

  • स्तनाग्र आतल्या बाजूला वळणं

  • स्तनाग्रातून कोणत्याही प्रकारचा द्रव किंवा स्त्राव येणं

यापैकी कोणतंही लक्षण दिसलं म्हणजे कॅन्सर आहे, असं नाही. मात्र असा बदल जाणवल्यास तो दुर्लक्षित न करता आठवड्याच्या आत डॉक्टरांचा सल्ला घेणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.

त्वचेचीही तपासणी करा

त्वचेवर असलेल्या तीळ, डाग किंवा रंगीत चट्ट्यांमध्ये कालांतराने काही बदल होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे. यासाठी चांगल्या प्रकाशात पूर्ण उंचीच्या आरशासमोर उभं राहा. मानेचा मागचा भाग, डोक्याची त्वचा आणि कानामागचा भाग पाहण्यासाठी छोट्या आरशाचा वापर करा. पाठ, नितंब आणि पायांच्या तळव्यांकडेही लक्ष द्या.

त्वचेवरील तीळ किंवा काळसर डाग तपासताना ABCDE नियम लक्षात ठेवा.

  • A – Asymmetry: तीळाचा एक भाग दुसऱ्या भागापेक्षा वेगळा दिसणं

  • B – Border: तीळाची कडा अनियमित किंवा विचित्र दिसणं

  • C – Colour: तीळामध्ये एकापेक्षा जास्त रंग दिसणं

  • D – Diameter: तीळाचा आकार 6 मिलिमीटरपेक्षा मोठा असणं

  • E – Evolution: कालांतराने तीळाचा आकार, रंग किंवा स्वरूप बदलणं

तोंडाची तपासणीही घरच्या घरी करता येते

भारतात तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण मोठं आहे. तंबाखू आणि सुपारीच्या सेवनामुळे हा धोका आणखी वाढतो. National Cancer Registry Programmeच्या आकडेवारीनुसार, भारतीय पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्व कॅन्सरपैकी जवळपास 30 टक्के कॅन्सर हा तोंडाच्या भागाशी संबंधित आहेत. तोंडाची तपासणी करण्यासाठी मोबाईलचा टॉर्च आणि आरसा पुरेसा आहे.

यामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम डोके थोडं मागे करून तोंडाच्या वरच्या भागाकडे पाहा. त्यानंतर गाल बाहेरच्या बाजूला ओढून गालाच्या आतील त्वचेची तपासणी करा. जीभ वर उचलून जिभेखालील भाग पाहा. तसंच जबड्याखाली आणि मानेच्या दोन्ही बाजूंना हाताने हलकेच स्पर्श करून काही वेगळे जाणवतं का ते तपासा.

खालील बदल दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांना दाखवा-

  • तोंडात पांढरा किंवा लाल चट्टा

  • न भरून येणारी जखम

  • जीभ किंवा ओठांमध्ये बधिरपणा जाणवणं

  • नव्याने गिळताना त्रास होणं

ही तपासणी करण्यासाठी दोन मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो. यासाठी मोबाईलचा टॉर्चही वापरता येतो.

मानेसह शरीरातील लिम्फ नोड्स तपासा

आपल्या शरीरात असलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे लहान गाठीसारख्या रचना असतात. शरीरात संसर्ग किंवा इतर काही बदल झाला तर त्या सुजलेल्या जाणवू शकतात. सर्दी, घसा दुखणं किंवा इतर संसर्गामुळे लिम्फ नोड्स सुजणं सामान्य आहे. मात्र कोणतंही स्पष्ट कारण नसताना एखादी गाठ सतत राहणं किंवा बराच काळ सूज कमी न होणं याकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळा लिम्फोमा किंवा कॅन्सर शरीराच्या दुसऱ्या भागातून पसरल्याचे हे लक्षण असू शकते.

पुरुषांनी अंडकोषांचीही स्वतः तपासणी करावी

15 ते 35 वयोगटातील पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणजेच अंडकोषाचा कॅन्सर हा सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सरपैकी एक आहे. पहिल्या टप्प्यात त्याचं निदान झाल्यास रुग्णाचं जगण्याचं प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा जास्त असतं. ही तपासणी गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर उभं राहून करणं सोपं जातं. कारण त्यावेळी अंडकोषाभोवतीची त्वचा सैल झालेली असते.

प्रत्येक अंडकोष अंगठा आणि पहिल्या दोन बोटांमध्ये हलकेच धरून हळूवारपणे फिरवा. अंडकोषाच्या पृष्ठभागावर एखादी कडक गाठ आहे का, आकारात काही बदल झाला आहे का हे तपासा. मात्र अंडकोषावरच कडक आणि न दुखणारी गाठ जाणवणं किंवा काही काळात एका अंडकोषाचा आकार दुसऱ्यापेक्षा वाढणं हे सामान्य मानलं जात नाही. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Bhojan : शिवभोजन योजनेबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नवीन GR जारी, आताच जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: अमरावती मधील विदर्भाचा राजा गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक रॅलीला सुरुवात.

Ghee : तूप खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? ६०% लोकांना माहितच नाही, आताच घ्या समजून

समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

SCROLL FOR NEXT