वयाच्या तिशीनंतर जवळजवळ प्रत्येकाला पांढऱ्या केसांची समस्या जाणवू लागते. यामध्ये काहींना ही समस्या त्यापूर्वीत सतावते. ज्याला अर्ली ग्रेइंग म्हणतात. पांढरे केस असणे हे सौंदर्य कमी करणारं नसलं तरी अनेकांना त्याची लाज वाटू शकते. अशावेळी एखादा पांढरा केस दिसला तर तो तोडून लपवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र असं करणं खरंच योग्य आहे का?
बर्याचदा लोक म्हणतात की, एक पांढरा केस तोडला तर त्याच्या आसपास अजून पांढरे केस उगवतात. हे खरं आहे का? चला, यामागचं सत्य जाणून घेऊया.
नाही. हा संपूर्णपणे चुकीचा समज आहे. तज्ज्ञ सांगतात की, एक पांढरा केस तोडल्याने इतर केसांचा रंग बदलत नाही. प्रत्येक केसाची स्वतःची मुळं म्हणजे हेअर फॉलिकल असतात. प्रत्येक फॉलिकलमध्ये मेलानोसाइट्स नावाची रंग तयार करणारी पेशी असते. ह्याच पेशी मेलेनिन तयार करतात, ज्यामुळे केस काळे किंवा तपकिरी दिसतात.
ज्यावेळी एखाद्या फॉलिकलमध्ये मेलेनिन तयार होणं कमी होतं, त्यावेळी त्या फॉलिकलमधून पांढरा केस उगवतो. त्यामुळे एक केस तोडल्याने इतर फॉलिकल्सवर काही परिणाम होत नाही. तोच केस पुन्हा उगेल आणि जर त्या फॉलिकलमध्ये मेलेनिन तयार होत नसेल, तर तो पुन्हा पांढराच येईल. मात्र, पांढरे केस तोडणं योग्य नाही कारण त्यातून अनेक नुकसानं होऊ शकतात.
वारंवार केस तोडल्याने फॉलिकलच्या आसपासची त्वचा कमजोर होते. त्यामुळे बॅक्टेरिया सहज पोहोचतात आणि लालसरपणा, सूज, वेदना किंवा पिंपलसारखे दाणे होऊ शकतात. दीर्घकाळ असं केल्याने फॉलिकल खराब होऊ शकतो.
केस जोरात ओढून काढल्यावर कधी कधी त्याची वाढण्याची दिशा बदलते. त्यामुळे नवीन केस बाहेर न येता त्वचेच्या आत वळतो. यामुळे लाल गाठ, खाज, वेदना आणि जळजळ होऊ शकते.
वारंवार केस ओढल्याने त्या जागी त्वचेवर जखम होते. संवेदनशील त्वचेच्या लोकांना खाज आणि लाल डाग जास्त जाणवतात.
सतत केस तोडल्याने त्या जागी काळे डाग किंवा निशाणं पडू शकतात. फॉलिकलवर दबाव आल्याने त्वचेत पिग्मेंटेशन वाढतं.
सतत केस ओढल्याने फॉलिकल इतका कमजोर होतो की त्या जागी केस येणं कमी होतं किंवा थांबतं. यामुळे केसांची वाढ पॅची दिसू शकते.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.