आजार, विशेषत: असंसर्गजन्य आजार (नॉन-कम्युनिकेबल डिजिजेज – एनसीडी) कशाप्रकारे विकसित होतात, कशाप्रकारे गंभीर रूप धारण करत जातात व उपचारांना कसा प्रतिसाद देतात यामध्ये व्यक्तीचे लिंग महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अलीकडच्या संशोधनांमधून दिसून आले आहे. स्त्रियांमधील संप्रेरकांच्या अर्थात हॉर्मोन्सच्या व्यवस्थेमुळे त्यांच्या बाबतीत बहुतांश एनसीडीs वेगळ्या मार्गाने विकसित होताना दिसतात.
इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन प्रमुख स्त्री संप्रेरकांचे पचनसंस्थेच्या स्नायूंवर नियंत्रण असते आणि पचन झालेल्या अन्नाच्या पुढे ढकलले जाण्यास जराही उशीर झाला तर मलावरोध निर्माण होतो. पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीच्या काळात या दोन हॉर्मोन्सच्या बदलत्या पातळ्यांमुळे होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा पचनसंस्थेच्या कार्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, ज्यातून काही वेळा कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठता, ब्लोटिंग म्हणजे पोट फुगणे, डायरिया किंवा शौचास जाण्याचे वेळापत्रक बिघडणे अशा समस्या उद्भवू शकतात. असे असले तरीही, अगदी अलीकडच्या काळापर्यंत वैद्यकीय समुदायाकडून हॉर्मोन्सच्या भूमिकेकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही.
महिलांच्या बाबतीत पाळी सुरू होण्याच्या आधीच्या दिवसांत हॉर्मोन्सची पातळी, विशेषत: इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी वरखाली होऊ लागते, ज्यामुळे आतड्यांच्या अन्न पुढे ढकलण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो व त्यामुळे कॉन्स्टिपेशनची समस्या होऊ शकते. कॉन्स्टिपेशन व त्याबरोबर होणारे ब्लोटिंग; ओटीपोटातले दुखणे आणि पाळीच्या दिवसांत जाणवणारी इतर लक्षणे स्त्रियांच्या नेहमीच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण करतात. त्याचप्रमाणे गरोदरपणामध्ये शरीर काही ठोस बदलांमधून जाते आणि आतडीही त्याला अपवाद राहत नाही.
प्रोजेस्टेरॉनची वाढती पातळी, वाढत्या गर्भाशयाचा दाब आणि होणाऱ्या मातांना गरोदरपणात घ्याव्या लागणाऱ्या लोहाच्या सप्लिमेंट्स या सगळ्यामुळे कॉन्स्टिपेशनमध्ये भर पडते. या दोन्ही टप्प्यांवर त्यांच्या आहारात फायबरची मात्रा वाढविणे, आयुर्वेदिक उपचारांचा आधार घेणे किंवा रोजच्या युक्त्या फारशा उपयुक्त ठरत नाहीत, कारण हॉर्मोन्सच्या सक्रियतेमध्ये होणारे बदल अडथळा बनून उभे राहतात. म्हणूनच लॅक्सेटिव्ह्ज घेण्यासारख्या उपचारात्मक उपाययोजना या समस्येवर एक सुरक्षित व झटपट इलाज मिळवून देतात. महिलांमध्ये वयाच्या 35व्या वर्षांपासून कॉन्स्टिपेशनची समस्या सुरू होते असे संशोधनातून दिसून आले आहे, म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये ही समस्या लवकर सुरू होते. योनिमार्गे झालेल्या प्रसूतीमुळेही बरेचदा स्त्रियांचे मूत्राशय आणि आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, असेही संशोधनातून दिसून आले आहे.
अगदी रजोनिवृत्तीच्या काळातही इस्ट्रोजेनची पातळी खालावत गेल्याने आतड्यांच्या आरोग्यावर सूक्ष्म पण कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. डिपार्टमेंट ऑफ मेडिसीन, बी. आर. सिंग हॉस्पिटल, ईस्टर्न रेल्वे, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत यांनी केलेल्या एका संशोधनानुसार कॉन्स्टिपेशऩची समस्या पुरुषांच्या तुलनेत वयोवृद्ध महिलांवर (60 वर्षे व त्यापुढील) अधिक परिणाम करते. काही महिलांना कोठा साफ होण्याची गती मंदावल्याचे अऩुभवास येते, वरचेवर बद्धकोष्ठता जाणवते, तर काहींना ब्लोटिंग आढळून येते किंवा पोटामध्ये अस्वस्थ वाटते. स्नायूंची तन्यता, ओटीपोटात खाली असलेल्या स्नायूंच्या जाळ्याची म्हणजे पेल्व्हिक फ्लोअरची ताकद आणि चयापचय क्रिया यांत होणारे बदलही पचनक्रिया आणि आतड्यांची हालचाल मंदावण्यास कारणीभूत ठरतात. मात्र, अनेकदा स्त्रिया आपल्याला पोट साफ न होण्याची समस्या आहे याची दखल घेत नाहीत आणि मग त्यांना बद्धकोष्टता सहन करावी लागते.
आपण जेव्हा रजोनिवृत्तीच्या, पाळीच्या आणि अगदी गरोदरपणाच्या काळातील लक्षणांवर चर्चा करतो, तेव्हा कॉन्स्टिपेशनचा विषय कधीही निघत नाही व कदाचित म्हणूनच आपल्या समस्येचे मूळ कारण आपला आहार किंवा जीवनशैली नसून हॉर्मोन्स आहेत, हे स्त्रियांना माहीतही नसते.
कॉन्स्टिपेशनचा प्रश्न येतो, तेव्हा खरेतर महिलांमधील या अज्ञानामुळे त्यांची समस्या अधिकच गंभीर बनू शकते. चुकीच्या अन्नपदार्थांना दोष देण्यापासून ते सुरक्षित उपचार टाळण्यापर्यंत अनके गोष्टी त्या अज्ञानापोटी करत राहतात व त्यामुळे कॉन्स्टिपेशनच्या समस्येभोवती संभ्रमाचे जाळे तयार होते. बरेचदा कॉन्स्टिपेशबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असतात, त्यामुळे डॉक्टरांची मदत कधी घ्यायची आणि ही समस्या प्रभावीपणे आटोक्यात कशी ठेवायची याबद्दल त्यांच्या मनात अनिश्चितता असते. या समस्येविषयीची मर्यादित माहिती आणि सर्वत्र आढळून येणाऱ्या भ्रामक समजूती यांमुळे स्त्रिया कॉन्स्टिपेशनशी मूकपणे झगडत राहतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना, विशेषत: वयोवृद्ध स्त्रियांना कॉन्स्टिपेशनची समस्या जडण्याची शक्यता अधिक असते असे सशोधनांतून सिद्ध झाले असूनही हे घडते. मर्यादित ज्ञान आणि या स्थितीविषयी सर्वत्र पसरलेल्या गैरसमजूती यांमुळे सर्व वयोगटातील स्त्रिया कॉन्स्टिपेशनशी मूकपणे झगडत राहतात.
सारक औषधे अर्थात लॅक्सेटिव्ह्ज, स्टूल सॉफ्टनर्ससारखे उपचारात्मक उपाय म्हणजे सोपे व खात्रीचे इलाज आहेत. कॉन्स्टिपेशन ही सर्वाधिक प्रमाणात आढळून येणाऱ्या समस्यांपैकी एक आहे, आणि जेव्हा फायबरचा अभाव असलेल्या फास्ट फूडची रेलचेल असलेला आहार, पुरेसे पाणी न पिणे यांसारख्या गोष्टी जीवनशैलीचा भाग बनतात तेव्हा हे सगळे घटकही एकत्रितपणे कॉन्स्टिपेशनला जबाबदार ठरतात. त्यातच शारीरिक व्यायामाचा अभाव, वाढलेला स्क्रीन टाइम आणि एकूणच बैठी जीवनशैली यांची भर पडली की ही समस्या अधिकच गंभीर स्वरूप धारण करते. मात्र, गरोदर महिलांनी लॅक्सेटीव्ह्ज व स्टूल सॉफ्टनर्स घेण्याआधी नेहमीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास स्टूल सॉफ्टनर्स आणि लॅक्सेटिव्ह्ज दोन्ही सुरक्षित आहेत. गरोदरपणा (प्रोजेस्टरॉन आणि लोहाच्या सप्लिमेंट्समुळे) किंवा रजोनिवृत्ती (पचनक्रिया आणि आतड्यांची हालचाल मंदावल्याने) यांसारख्या स्थितींमध्ये कॉन्स्टिपेशनची समस्या लगेचच बळावू शकते व अशावेळी ही औषधे विशेषत्वाने परिणामकारक ठरतात. त्यांच्या अतिवापरामुळे मात्र अवलंबित्व तयार होऊ शकते किंवा इलेक्ट्रोलाइट्समध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते, तेव्हा त्यांना पाणी पिणे, तंतूमय पदार्थ खाणे आणि सक्रिय राहणे यांसारख्या सवयींची जोड देणे उत्तम. ही संपूर्ण माहिती डॉ. राकेश पटेल, सीनिअर कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.