आजकल हार्ट अटॅकने मृत्यु पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच लहान वयातही हार्ट अटॅक येण्याच्या घटनेत झपाट्याने वाढ होत आहे. हार्ट अटॅकने मृत्यु पावणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. परंतु एका काळानंतर महिलांमध्ये देखील हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे. पण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षण वेगळी असतात म्हणून अनेकदा महिलांवर वेळेवर उपचार करता येत नाही. हार्ट अटॅक येण्याआधी महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत काही वेगळी लक्षणं दिसतात. महिलांमध्ये मध्ये हार्ट अटॅकची लक्षणं कोणती असतात जाणून घ्या.
हार्ट अटॅक येण्याआधी छातीत दुखणे हे सामान्य लक्षण मानले जाते. पण याशिवाय हार्टअटॅक येण्याआधी महिलांमध्ये काही वेगळी लक्षण दिसतात. हार्ट अटॅक येण्याआधी काहीही न करता सतत थकवा जाणवतो. तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होणे, किंवा काही काम करताना श्वास घेण्यासाठी त्रास होणे, मान, पाठ आणि जबडा दुखणे, हार्ट अटॅकच्या वेळी मळमळ किंवा उलटी होणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे, अचानक घाम फुटणे, चलबिचल होणे किंवा पोटात दुखणे यांसारखी लक्षण दिसून येतात. अशी लक्षण जाणवल्यास त्वरित डॅाक्टरांचा सल्ला घ्या.
उच्च रक्तदाब, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रोल, धुम्रपान, ताणतणाव आणि लठ्ठपणा यामुळे महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढते. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येतो. हाय कोलेस्ट्रोलमुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच सतत ताणतणावात राहिल्यामुळे हृदयावर दबाव वाढतो. याच्या परिणामी हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.
आरोग्याची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. आणि हार्ट अटॅक सारख्या आजारांना बळी पडू शकतो. हार्ट अटॅक टाळण्यासाठी जीवनशैली आणि आहारात सुधार केला पाहिजे. यासाठी दररोज आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
हेल्दी आहारासोबत नियमित व्यायाम करा. दररोज ३० ते ४० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करा. वजन नियंत्रिणात ठेवा. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करा. तसेच धूम्रपानची सवय असेल तर धुम्रपान सोडा. धूम्रपान सोडल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होण्याची शक्यता असते. वर्षातून किमान एकदा संपूर्ण आरोग्याची तपासणी करा. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी डॅाक्टरांचा सल्ला घ्या. ताण व्यवस्थापन योग्य रित्या करा. रोजच्या जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी दररोज ३० मिनिटे योगा किंवा ध्यान करा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited By: Priyanka Mundinkeri