Child Cough Causes saam tv
लाईफस्टाईल

Child Cough Causes: मुलांना दोन आठवड्यांपासून खोकला येतोय? फुफ्फुसांशी संबंधित 'हा' गंभीर आजार असण्याची शक्यता!

Persistent Cough in Children: लहान मुलांना सतत खोकला येत असेल तर दुर्लक्ष करू नका. वायुप्रदूषण, दमा, अॅलर्जी, संसर्ग आणि क्षयरोगामुळे खोकला होऊ शकतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला राहिल्यास कोणत्या तपासण्या कराव्यात आणि डॉक्टरांकडे कधी जावं, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

बदलतं हवामान, वाढतं वायुप्रदूषण आणि हवेत असलेली धूळ यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक मुलांना सतत खोकला येणे, घशात खवखव होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या जाणवत आहेत. अनेकदा पालक हा खोकला हवामानातील बदल किंवा सर्दीमुळे होत असल्याचे समजतात. त्यामुळे सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

पण खोकला अनेक दिवस कायम राहत असेल किंवा वारंवार होत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. कारण वायुप्रदूषणासोबतच संसर्ग, अॅलर्जी, दमा आणि इतर आजारांमुळेही मुलांना सतत खोकला येऊ शकतो. त्यामुळे खोकल्यामागचं नेमके कारण वेळीच समजून घेणं आणि योग्य उपचार करणं महत्त्वाचं आहे.

वायुप्रदूषणाचा परिणाम केवळ मोठ्या माणसांवरच होत नाही, तर लहान मुलांनाही त्याचा त्रास होतो. मुलांची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात. तसंच मोठ्या माणसांच्या तुलनेत मुलांचा श्वास घेण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे ते श्वासातून जास्त प्रमाणात प्रदूषित घटक शरीरात घेतात. वाहनांचा धूर, बांधकामांमधील धूळ आणि हवेत असलेले बारीक धूलिकण यामुळे मुलांच्या श्वसनमार्गाला सूज येऊ शकते. यामुळे खोकला, छातीत घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. दमा किंवा अॅलर्जी असलेल्या मुलांना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते. याशिवाय विषाणू आणि जिवाणूंच्या संसर्गामुळेही खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

याबाबत पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलचे वरिष्ठ नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख यांनी सांगितलं की, "मुलांना सतत खोकला येत असेल, खोकल्याचं प्रमाण वाढत असेल किंवा वारंवार हा त्रास होत असेल तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. वायुप्रदूषणामुळे श्वसनमार्गाला त्रास होऊन खोकला, छातीत घरघर आणि धाप लागण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दमा किंवा अॅलर्जी असलेल्या मुलांमध्ये हा त्रास अधिक जाणवतो. पण खोकल्यासोबत ताप येणं, वेगाने श्वास घेणं, छातीत दुखणं, दूध किंवा जेवण न जाणं आणि सतत थकवा जाणवणं अशी लक्षणं दिसत असतील तर संसर्गाची शक्यताही तपासणं गरजेचं आहे. काही वेळा न्यूमोनियाची सुरुवातही साध्या सर्दीसारख्या लक्षणांनी होते. त्यामुळे प्रत्येक खोकला प्रदूषणामुळेच होतो, असं समजू नये. डॉक्टरांकडून मुलांची योग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे."

ते पुढे म्हणाले, "खोकला किती दिवसांपासून आहे, तो कोणत्या वेळी जास्त वाढतो आणि त्यासोबत इतर कोणती लक्षणं दिसतात, यावरून त्याचं कारण समजू शकतं. विषाणूंच्या संसर्गामुळे होणारा खोकला हळूहळू कमी होतो. तर प्रदूषणामुळे होणारा खोकला बाहेर गेल्यानंतर किंवा खराब हवेच्या संपर्कात आल्यानंतर वाढू शकतो. पण दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला राहत असेल तर क्षयरोगाची तपासणी करणं गरजेचं आहे. छातीचा एक्स-रे आणि काही आवश्यक चाचण्यांच्या मदतीने याचे निदान करता येते. वारंवार छातीत घरघर होणं, रात्री खोकला वाढणं किंवा सतत खोकला येणं ही दम्याची किंवा अॅलर्जीची लक्षणंही असू शकतात. त्यामुळे पालकांनी स्वतःहून आजाराचं निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."

मुलांना जोरात श्वास घेण्यास त्रास होत असेल, श्वास घेताना छाती आत ओढली जात असेल, ओठ निळसर पडत असतील किंवा बोलताना आणि दूध पिताना त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जावे. मुलाला खूप गुंगी येणं हेदेखील गंभीर लक्षण असू शकतं. अशा वेळी वैद्यकीय मदत घेण्यास उशीर करू नये. मुलांच्या प्रकृतीनुसार, डॉक्टर पुढील तपासण्या आणि उपचार ठरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खोकल्याची औषधं, अँटिबायोटिक्स किंवा घरगुती उपचार करू नयेत. यामुळे आजाराचे योग्य निदान आणि उपचार करण्यास उशीर होऊ शकतो.

दरम्यान, वाढत्या वायुप्रदूषणाचा परिणाम मोठ्या माणसांच्या फुफ्फुसांवरही होत आहे. याबाबत पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. संजय नगरकर यांनी सांगितलं की, "हवेत वाढणाऱ्या प्रदूषित घटकांमुळे श्वसनमार्गाला त्रास होऊ शकतो. गेल्या 15 ते 20 दिवसांत आमच्या ओपीडीमध्ये सतत खोकला येणं, घशात खवखव होणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं अशा तक्रारी घेऊन अनेक रुग्ण आलेत. यामध्ये 25 ते 55 वयोगटातील अंदाजे 5 ते 6 प्रौढ, 60 वर्षांवरील 3 ते 4 ज्येष्ठ नागरिक आणि 5 ते 10 वयोगटातील 1 ते 2 लहान मुलांचा समावेश आहे."

ते पुढे म्हणाले, "प्रदूषित हवेत सतत राहिल्यामुळे श्वसनमार्गाला सूज येऊ शकते आणि अॅलर्जीचा त्रास वाढू शकतो. तसंच आधीपासून दमा किंवा ब्राँकायटिसचा त्रास असलेल्या रुग्णांची समस्या अधिक वाढू शकते. यामुळे अनेकांना रात्री नीट झोप न लागणं, थकवा जाणवणं आणि शारीरिक हालचाली करताना त्रास होणं अशा समस्या उद्भवू शकतात. काही जणांना दैनंदिन कामं करणंही कठीण जातं. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेळेवर वैद्यकीय तपासणी करणं आणि श्वसनाच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खर्गेंसह इंडिया आघाडीचे नेते चेन्नई आणि मुंबई दौऱ्यावर; स्टॅलिन, शरद पवारांची घेणार भेट

Bus Accident : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली; आठ प्रवासी जखमी

Clothes Storage : कपाट खरेदीचा खर्च वाचवा! कमी जागेत कपडे ठेवण्याच्या ६ स्मार्ट अन् सोप्या आयडिया

Aluminium foil: गरम अन्न फॉइलमध्ये गुंडाळल्याने त्यात मिसळू शकतं अॅल्युमिनियम? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात!

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! ३ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी 'धनुष्यबाण' घेतला हाती

SCROLL FOR NEXT