गणेश शिंगाडे, गडचिरोली
गडचिरोली-सावली मार्गावर शनिवारी सायंकाळी एसटी बसचा भीषण अपघात झाला. किसाननगर गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला उलटली. या दुर्घटनेत आठ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी प्रवाशांना मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ बीटी ५००९ क्रमांकाची एसटी बस गडचिरोली येथून सावलीच्या दिशेने जात होती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही बस किसाननगर गावाजवळ पोहोचली. त्याचवेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. बस उलटल्याचा आवाज ऐकताच गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कोणतीही वेळ न घालवता बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच जखमींना मदत करून उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली.
या अपघातात पल्लवी दुधे, अयान दुधे, प्रियाश दुधे, ज्योती मडावी, आशिष मडावी, रघुराज शेडमाके, नथूजी शेडमाके आणि इंदुबाई बांबोडे हे आठ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच टोल नाक्याची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर सर्व जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या अपघातानंतर एसटी महामंडळाच्या बसच्या स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गडचिरोली परिसरातील काही मार्गांवर जुन्या आणि खराब अवस्थेतील बसेस धावत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. अशा बसेसमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी जुन्या बसेस बदलून नवीन आणि चांगल्या स्थितीतील बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.