सध्या लहान मुलांना मैदानी खेळ खेळायला जास्त आवडत नाहीत. त्यांना घरबसल्या तासंतास मोबाईलवर स्क्रीन स्क्रोलिंग करणं जास्त आवडायला लागलंय. मात्रा या वाईट सवयींचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच त्यांच्या शरीरावर, डोळ्यांवर होतो. स्क्रीन्स खूप जास्त वेळ बघत राहिल्याने मायोपिया, डोळे कोरडे पडणे, डोकेदुखी आणि स्पष्ट न दिसणे अशा अनेक समस्या मुलांमध्ये वाढतायेत. जवळचं दिसतं पण लांबचे मात्र स्पष्ट दिसत नाही अशा स्थितीला मायोपिया म्हणतात. आधी हा विकार जास्त करून आनुवंशिकतेमुळे व्हायचा पण आता मात्र मायोपियाची समस्या जीवनशैलीमध्ये मूळ धरू लागली आहे. जाणून घेऊयात मायोपियाचा धोका आणि कारणे तज्ज्ञ डॉ. अरुण सिंघवी, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, एएसजी आय हॉस्पिटल यांच्याकडून.
स्क्रीन्सवर खूप जास्त वेळ घालवणे, घराबाहेर मोकळ्या वातावरणात खूपच कमी जाणे किंवा अजिबात न जाणे ही याची प्रमुख कारणे बनली आहेत. आजकाल स्क्रीन्स पाहणाऱ्या मुलांची नजर जवळच्या गोष्टींवर खूप जास्त वेळ टिकून असते, त्यामुळे हळूहळू अशी स्थिती येते की त्यांच्या डोळ्यांना लांबच्या गोष्टी पाहण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.
बराचवेळ फक्त जवळच्या गोष्टी पाहत राहिल्याने डोळ्यांवरील तणाव वाढतो, डोळे कोरडे पडतात आणि हळूहळू डोळ्यांच्या संरचनेमध्ये बदल होऊ लागतात, त्यामुळे मायोपिया होतो. घराबाहेर, मोकळ्या वातावरणात, मैदानावर जाऊन खेळणे आता जवळपास बंद झाले आहे. नैसर्गिक प्रकाशामुळे रेटिनामध्ये डोपामिन रिलीज होते, हे रसायन डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये अतिरिक्त एलॉन्गशन होण्यापासून रोखते, जे मायोपियाचे सर्वात मोठे कारण आहे.
गेल्या दशकभरात भारतातील नेत्ररोगतज्ञांच्या असे लक्षात आले आहे की, मुलांमध्ये मायोपियाच्या केसेस खूप वेगाने वाढत आहेत. याबाबतीत भारत जागतिक ट्रेंड्सनुसार पुढे जात आहे. संशोधनात आढळून आले आहे की, जी मुले डिजिटल डिव्हायसेसवर तीन तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात त्यांना डोळे थकणे किंवा कमी वयात मायोपियाचा धोका हा मोकळ्या वातावरणात वेळ घालवणाऱ्यांच्या तुलनेत दोन पट जास्त असतो.
डिजिटलला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या आजच्या जगात मुलांचा स्क्रीन टाइम पूर्णपणे बंद करणे शक्य नाही, पण तो कमी नक्कीच करता येतो. मुलांना दररोज किमान दोन तास घराबाहेर, मोकळ्या जागेत, मैदानावर खेळायला पाठवा. नैसर्गिक प्रकाश त्यांच्या डोळ्यांसाठी सर्वोत्तम प्रतिबंधात्मक औषध आहे. सायकलिंग, खेळणे किंवा बाहेर चालणे, धावणे यातून मुलांना नैसर्गिक प्रकाश मिळू शकतो, ज्यामुळे डोळ्यांचा निरोगी विकास होण्यास आणि मायोपिया होण्याचा धोका टाळण्यास मदत होईल.
जागतिक आरोग्य संघटनेने असे सुचवले आहे? की, मुलांसाठी खासकरून पाच वर्षांपेक्षा कमी वर्षांच्या मुलांसाठी एकाजागी बसून राहणे योग्य नाही, त्यांनी घराबाहेर, मोकळ्या वातावरणात खेळले पाहिजे. एकाजागी बसून स्क्रीन पाहत राहण्यापेक्षा त्यांच्या शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत. घराबाहेर, मोकळ्या वातावरणात वेळ घालवल्याने मुलांना मायोपिया होणे रोखले जाऊ शकते. शाळेतून आल्यावर, सुट्टीच्या दिवशी घराबाहेर, मोकळ्या वातावरणात वेळ घालवण्यास प्रोत्साहन द्या.
आईवडील, कुटुंबातील सदस्य मनोरंजनासाठी स्क्रीनवर घालवला जाणारा वेळ मर्यादित ठेवा? अमेरिकन अकॅडेमी ऑफ पीडियाट्रिक्सने दोन वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठी डिजिटल स्क्रीन टाळण्याचा आणि २ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शिक्षणाव्यतिरिक्त स्क्रीन टाइम एक तासाहून कमी ठेवण्याची सूचना केली आहे. त्याहून मोठ्या वयाच्या मुलांसाठी स्क्रीन शेड्युल संतुलित असले पाहिजे, त्यामध्ये सतत ब्रेक्स असणे आवश्यक आहे. "२०-२०-२० नियम" लागू करा. दर २० मिनिटांनी, २० सेकंद, २० फीट लांब वस्तूकडे पहा. जेवणाच्या वेळा निश्चित असल्या पाहिजेत, झोपण्याच्या कमीत कमी एक तास आधीपासून स्क्रीन्सपासून पूर्णपणे लांब असलेच पाहिजे.
सर्जनशील आणि सामाजिक ऍक्टिव्हिटीज, जसे की, चित्र काढणे, बोर्ड गेम्स खेळणे इत्यादी सुरु करून मुलांना मनोरंजनासाठी गॅजेट्सवर अवलंबून राहणे कमी करण्याची सुरुवात करता येईल. जेव्हा मुले किंवा तुम्ही स्क्रीन्सचा उपयोग करत असाल तेव्हा मुलांसोबत बसा आणि जे पाहत आहात त्याविषयी बोला. स्क्रीन्स कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून पाहिल्याने, विचार न करता काहीही पाहत राहण्याऐवजी समीक्षात्मक विचार आणि ऑनलाईन सुरक्षा शिकवण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात.
बिल्ट-इन कंट्रोल्सचा उपयोग देखील तुम्ही करून घेऊ शकता? जसे की, ऑटोप्ले ठेवू नका, म्हणजेच व्हिडिओ किंवा कोणताही कन्टेन्ट आपोआप सुरु होण्यापासून रोखा, पुश नोटिफिकेशन्स म्हणजे ऍप्सकडून येणारे नोटिफिकेशन्स बंद करा, ऍप्स आणि डिव्हाईसच्या उपयोगाची वेळ निश्चित ठेवा, डाउनटाईम म्हणजे डिव्हाईसचा उपयोग न करण्याच्या वेळा ठरवून ठेवा. डिफॉल्ट डिस्प्ले (ग्रेस्केल असेल तरी) सोपा ठेवा जेणेकरून लक्ष विचलित होण्याचे किंवा स्क्रीनकडे आकर्षित होण्याचे प्रमाण कमी होईल. या उपकरणांच्या उपयोगावर लावलेले नियम तोडले गेले तर काय करायचे हे आधीच ठरवलेले असावे. जर मुले स्वतःहून स्क्रीन बंद करत असतील तर त्यांचे कौतुक करा.
सध्याच्या काळात डिजिटल साक्षरता आवश्यक आहे ? डिजिटल कल्याण व्हावे यासाठी आईवडिलांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची आहे. आपल्या मुलाला पुढे जाण्यात मदत करण्यासाठी स्क्रीनवर प्रतिबंध घालण्याची गरज नाही. झोप, शारीरिक हालचाली आणि समोरासमोर बसून बोलणे किंवा काहीतरी खेळणे, करणे याला प्राधान्य द्या, स्क्रीन्सना झोपण्याच्या खोलीच्या बाहेर ठेवा आणि जेव्हा मुलांसमोर मीडिया सुरु असेल तेव्हा त्यांच्यासोबत राहा. परफेक्शन हा उद्देश नाही - एक असे निरोगी संतुलन हवे ज्यामुळे तंत्रज्ञान तुमच्या मुलांच्या आरोग्यावर घाला घालणार नाही, तर त्यांना पूरक ठरू शकेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.