आपल्याला वेगवेगळ्या पेयांचा आस्वाद घ्यायला खूप आवडतं. दररोज काही न काही पेयाचे आपण सेवन करतच असतो. कधी सोडा , कधी मद्य, तर कधी एनर्जी ड्रिंक्स. पण दररोज ड्रिंक्स म्हणजेच पेय प्यायल्याने शरीराला हानी पोहचू शकते. आणि अशा सवयी आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. यकृत हा आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे. दररोज अशा पेयांचे सेवन केल्यास यकृत हळूहळू कमकुवत होतो. यकृत हे आपल्या शरीरातली घाण साफ ठेवण्याचे काम करतात. तसेच फॅट्स चे मेटाबॅालिजम मध्ये रुपांतर करतात आणि पचनक्रियेसाठी समर्थन देत महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अश्या प्रकारच्या ड्रिंक्सचे सेवन रोज केल्याने यकृतावर परिणाम होतो आणि यकृताला नैसर्गिक रित्या काम करायला अडचण येते. जाणून घेऊया हि ४ पेय कोणती आहे ज्याचा परिणाम यकृतावर होतो.
अल्कोहोल
मद्यप्राशन आपल्या शरीरासाठी चांगले नाही हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. दररोज दारुचे सेवन केल्यास यकृतावर गंभीर परिणाम होतात. यकृताला सूज येते आणि यकृत व्यवस्थितरित्या काम करु शकत नाही. जास्त प्रमाणात मद्यप्राशन केल्यास अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होतो. आणि यकृत हळूहळू कमकुवत होऊन निकामी होतो.
सोडा
सोडा सारख्या पेयांमध्ये अतिप्रमाणात साखर आणि मीठचा वापर केला जातो. त्याचबरोबर यामध्ये अतिप्रमाणात आर्टिफिशयल अॅलिमेंटसचा वापर केले जातो. ज्याचा यकृतावर परिणाम होतो.आणि दररोज सॅाफ्ट ड्रिंक्स सारखे पेयाचे सेवन केल्याने यकृतावर ताण येऊन फिल्टरेशनच्या क्रियेमध्ये अडथळा येतो. त्यावेळी यकृत पूर्णपणे फिल्टर न झाल्याने यकृताला सूज येते आणि नॅान अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होऊ शकतो. यामध्ये यकृतामध्ये फॅट म्हणजेच चरबी जमा होण्यास सुरुवात होते.
शुगर ड्रिंक्स
सॅाफ्ट ड्रिंक्स मध्ये साखर भरपूर प्रमाणात असतात पण फ्लेवर्ड चहा, फ्रुट ज्युस, फ्रुट पंच यामध्ये सुद्धा अतिप्रमाणात साखर असते. तसेच यात कॅफिन, आणि प्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते. आणि याचा थेट परिणाम यकृतावर होतो. आणि यकृतामध्ये फॅट्स जमा होऊन नॅान फॅटी लिव्हर डिसीज होऊ शकतो. त्यामुळे अतिसाखरयुक्त पेयांच्या सेवनाचे प्रमाण कमी केले पाहिजे. अन्यथा हळूहळू यकृताला सूज येते आणि फाइब्रोसिस आणि सिरोसिस सारख्या गंभीर आजारांना बळी पडू शकतो.
एनर्जी ड्रिंक्स
तरुणांमध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या सेवनाचे प्रमाण अधिक आहे. बाहेरच्या उष्णते पासून आराम मिळावा आणि शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी आपण एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतो. परंतु याचा आपल्या यकृतावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहित नसते. अशा प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्स मध्ये अतिप्रमाणात कॅफिन, टॅरिन आणि काही उत्तेजक पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे अशा प्रकापचे पेय प्यायल्यानंतर आपल्याला काही काळासाठी उर्जा मिळते आणि थकवा मिटतो. मात्र, हे ड्रिंक्स यकृताला इजा पोहचवतात . पुढे लिव्हर ट्रांन्सप्लांट म्हणजेच यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते.