मधुमेह हा केवळ चाळीशी ओलांडल्या नंतरच होतो किंवा मधुमेह मुख्यतः वयस्कर लोकांनाच होतो अशी मान्यता आपल्या समाजामध्ये आहे. परंतु आजकलच्या काळात जास्तीत जास्त तरुण हे मधुमेह सारख्या आजारांना बळी पडत आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये हा आकडा वाढत चालला आहे. मधुमेह हा केवळ जास्त गोड खाल्ल्याने होतो अशी समज आहे. पण, खराब जीवनशैली, वातावरणातील बदल, खाण्यापिण्यात झालेला बदल, लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास अश्या बऱ्याच गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत. तरुणच नव्हे तर लहान मुलांमध्ये देखील हा आकडा वाढत चालला आहे.
मधुमेहाचे काही प्रकार आहेत. टाइप १ मधुमेह आणि टाइप २ मधुमेह, जेस्टेशनल मधुमेह म्हणजेच गर्भधारणा मधुमेह. सर्वाधिक तरुण हे टाइप २ मधुमेहाचे शिकार होत आहेत. जेव्हा रक्तातील साखर अनियंत्रित होते. त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करु शकत नाही. आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. तेव्हा एखादी व्यक्ती मधुमेह आजाराची बळी ठरते. इन्सुलिन हे रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
टाइप २ मधुमेहाला सर्वाधिक बळी तरुण पडत आहेत. यासाठी काही गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहेत.
हालचालीचा अभाव
तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहेत. याला कारण म्हणजे, खराब जीनवशैली. स्मार्टफोन, व्हिडिओ गेम्स स्ट्रिमिंग यारख्या गोष्टींचे तरुणांना भरपूर वेड आहे. एकाच जागी तासनतास मोबाईल वापरणे. त्यातच अधिक काळ गेम्स खेळणे यामुळे शरीराची हालचाल होत नाही. याच्याच परिणामी वजन वाढते. आणि इन्सुलिन प्रतिरोधकतमुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
खराब खाण्याच्या सवयी
तरुणांमध्ये, प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, शुगर ड्रिंक्स तसेच इन्सटंट फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्या फूडस मध्ये अधिक प्रमाणात मीठ, साखर आणि फॅटस म्हणजेच चरबी असते. दररोज अश्या प्रकारचे पदार्थांचा आहारात समावेश केल्याने अपचन आणि लठ्ठपणा सारखे आजार ओढावले जाऊ शकतात. तसेच वेळेवर न जेवणे, नियमित झोप न होणे यामुळे तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे.
लठ्ठपणा
दररोज बाहेरचे खाणे, बसून राहणे, व्यायाम न करणे यामुळे आयुष्यभराचा लठ्ठपणा येतो. त्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकतेचे प्रमाण वाढते. शरीरातली वाढती चरबी मधुमेहासाठी मुख्य कारण बनू शकते. लॅपटॅाप वर दिवसरात्र बसून काम करणे, त्यातच योग्य आहार न खाणे यामुळे तरुणांमध्ये टाइप २ मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे.
काम आणि ताणतणाव
आजकलच्या धावत्या काळात तरुण हे आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहतात. त्यामुळे जास्त काम , झोप न होणे, ताणतणाव यारख्या गोष्टींचा त्रास होतो. कामाच्या आणि अभ्यासाच्या ताणतणावामुळे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. जास्त तणावामुळे शरीरातील हार्मोन्स मध्ये बदल होतो आणि हार्मोन्स असंतुलित होतात. याचा परिणाम शरीराच्या वजनावर होऊन , वजन अनियंत्रित होण्यास सुरुवात होते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रित केले जाऊ शकते.
कौटंबिक इतिहास
जर कुंटुबामधील व्यक्तीला मधुमेहाचा आजार असतो तर त्या कुटुंबा मधील पुढच्या पिढीला मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यातच खराब जीवनशैली असेल तर याची शक्यता नाकारता येत नाही.
तरुणांनी स्वतःला मधुमेहापासून वाचवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात. रोज व्यायाम करावे, आणि संतुलित आहार घ्यावे आणि शक्यतो बाहेरच खाणे टाळणे अश्या गोष्टी केल्या पाहिजेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited by: Priyanka Mundinkeri