आपल्या शरीरातील सर्व अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम हृदय करत असते. हृदयाची धडधड आणि रक्तदाब हे दोन्ही एकत्रितपणे शरीरातील प्रत्येक भागाला आवश्यक तेवढा रक्तपुरवठा होण्यासाठी मदत करतात. मात्र काही वेळा हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा कमी होतात किंवा रक्तदाब कमी राहतो. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हृदयाचे ठोके कमी झाल्यामुळे रक्तदाबही कमी होऊ शकतो का
ओनली माय हेल्थ वेबसाईटला माहिती देताना जालंधरचे सर्वोदय हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दीबांशू गुप्ता यांनी सांगितलं की, एखादी व्यक्ती पूर्णपणे आरामात असताना तिच्या हृदयाचे ठोके साधारणपणे एका मिनिटात ६० ते १०० दरम्यान असणं सामान्य मानलं जातं. जर हृदयाचे ठोके एका मिनिटाला ६० पेक्षा कमी असतील, तर त्या स्थितीला ब्रॅडीकार्डिया किंवा लो हार्ट रेट असे म्हणतात.
मात्र प्रत्येक व्यक्तीमध्ये ६० पेक्षा कमी हार्ट रेट म्हणजे समस्या असं नाही. विशेषतः काही खेळाडू किंवा नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके नैसर्गिकरित्या कमी असू शकतात. रक्तदाब ९०/६० mmHg पेक्षा कमी असल्यास तो लो ब्लड प्रेशर मानला जातो.
डॉ. गुप्ता सांगतात की, काही परिस्थितींमध्ये हृदयाचे ठोके खूप कमी झाल्यामुळे रक्तदाबही कमी होऊ शकतो. हृदय जर खूप हळूहळू धडधडत असेल तर शरीराच्या गरजेनुसार पुरेसं रक्त पंप करण्यात त्याला अडचण येऊ शकते. त्यामुळे काही लोकांमध्ये रक्तदाब घसरतो आणि शरीरातील इतर अवयवांपर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नाही.
मात्र प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही. अनेक लोकांचा हार्ट रेट कमी असला तरी त्यांचा रक्तदाब पूर्णपणे सामान्य राहू शकतो. त्यामुळे लो हार्ट रेट आणि लो ब्लड प्रेशर यांचा संबंध प्रत्येक व्यक्तीत सारखाच असेल, असं मानता येत नाही.
हृदयाचे ठोके कमी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. वाढतं वय हे त्यापैकी एक महत्त्वाचं कारण आहे. याशिवाय हृदयाशी संबंधित काही आजार, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन, थायरॉईड हार्मोनची कमतरता तसंच काही औषधांचे दुष्परिणाम यामुळेही हार्ट रेट कमी होऊ शकतो.
हृदयाचे ठोके कमी झाल्यामुळे शरीराच्या विविध भागांपर्यंत पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचत नाही. त्यामुळे काही ठराविक लक्षणं दिसू शकतात.
अशक्तपणा जाणवणं, वारंवार चक्कर येणं, खूप थकवा जाणवणं, श्वास घेण्यास त्रास होणं, कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करता न येणं, बेशुद्ध पडणं किंवा छातीत अस्वस्थता जाणवणं ही त्यातील प्रमुख लक्षणे आहेत.
ही लक्षणे वारंवार दिसत असतील किंवा अचानक सुरू झाली असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.