छातीतील वेदना गॅस किंवा हृदयविकार असू शकते.
गॅसच्या वेदनेनंतर ढेकर येते आणि आराम होतो.
हृदयविकाराची वेदना डाव्या हातापर्यंत पसरते.
छातीत होणाऱ्या वेदना या गॅसचा त्रास आहे की हृदयविकाराचा झटका, हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण चुकीचा अंदाज जीवघेणा ठरू शकतो. बहुतांश वेळा लोक सौम्य वेदना गॅस म्हणून दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
छातीत वेदना झाली की बहुतांश लोकांना हृदयविकाराच्या झटक्याची भीती वाटते. पण प्रत्येक छातीचा वेदना हा हृदयविकार नसतो. पोटात किंवा आतड्यात गॅस अडकला तरही छातीमध्ये तीव्र किंवा जळजळीसारख्या वेदना होऊ शकतात. काही वेळा ही वेदना हृदयविकारासारखीच जाणवतात. जेवण फार घाईघाईत करणं, तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणं तसंच कार्बोनेटेड ड्रिंक्स पिणं यामुळे गॅस वाढतो.
एका वेबसाईटला माहिती देताना डॉ. संजय द्विवेदी सांगतात की, छातीतील वेदना हा गॅस किंवा हृदयविकाराचा झटका दोन्हीपैकी कुठलाही असू शकतो. त्यामुळे लक्षणांची योग्य ओळखणं खूप गरजेचं आहे.
गॅस हा पचनासंबंधी त्रासामुळे होतो. पोटात आणि आतड्यात हवा अडकली की वरच्या पोटापासून छातीपर्यंत तीव्र, आकडीसारखी किंवा जळजळ करणारी वेदना होते. या वेदनेसोबत पोट फुगणं, ढेकर येणं, अंगात जडपणा वाटणे ही लक्षणं दिसतात.
यातील मुख्य फरक असा की शरीराची स्थिती बदलल्यावर, ढेकर आल्यावर किंवा वायू बाहेर गेल्यावर ही वेदना कमी होते. साधारणत: जेवल्यानंतर किंवा थंड-कार्बोनेटेड पेय घेतल्यानंतर हा त्रास होतो.
हृदयविकाराचा झटका हा आपत्कालीन वैद्यकीय स्थिती आहे. यात हृदयाकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यावर अडथळा निर्माण होतो. त्यामुळे छातीत दडपल्यासारखं, जडपणा किंवा घट्टपणा जाणवतो. ही वेदना डाव्या हातात, जबड्यात, मानेत, पाठीवर किंवा खांद्यावरही पसरते.
या वेदनेसह घाम येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, भोवळ येणं, मळमळणं, उलट्या होणं अशी लक्षणं दिसतात. हृदयविकाराच्या झटक्यातील वेदना विश्रांती घेतल्याने किंवा स्थिती बदलल्याने कमी होत नाही. ही वेदना सलग 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते.
जर छातीत दडपण, वेदना हात, जबडा, मान किंवा पाठीवर पसरत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, घाम येत असेल, मळमळ किंवा अस्वस्थता जाणवत असेल आणि ही लक्षणं पटकन कमी होत नसतील तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. सौम्य वेदना म्हणून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकते कारण प्रत्येक व्यक्तीची हृदयविकाराची लक्षणं वेगळी असू शकतात.
डॉ. संजय यांच्या मते, आतडे आणि हृदय यांतील मज्जातंतू एकाच भागाशी संबंधित संकेत पाठवतात. त्यामुळे डाव्या बाजूला गॅस झाला की तो डायाफ्रामवर दबाव टाकतो. त्यामुळे छातीत वेदना जाणवते आणि ती हृदयविकाराच्या झटक्यासारखी वाटू शकते. मात्र, थोडाही संशय असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच सुरक्षित असते.
छातीतील वेदना गॅसची आहे का हृदयविकाराची हे कसे ओळखावे?
ढेकर आल्यावर आराम झाला तर गॅस, नाहीतर हृदयविकार संशयित करावा.
गॅसमुळे होणाऱ्या वेदनेसोबत कोणती लक्षणे दिसतात?
पोट फुगणे, ढेकर येणे आणि अंगात जडपणा येणे.
हृदयविकाराच्या झटक्यात वेदना किती वेळ टिकते?
हृदयविकाराची वेदना सलग १० मिनिटांपेक्षा जास्त टिकते.
हृदयविकाराची वेदना कोणत्या भागात पसरते?
डाव्या हातात, जबड्यात, मानेत आणि पाठीवर पसरते.
गॅसची वेदना हृदयविकारासारखी का वाटते?
आतडे आणि हृदयाचे मज्जातंतू एकाच मार्गाने संकेत पाठवतात.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.