Heart attack risk saam tv
लाईफस्टाईल

Heart attack risk: तुम्हीही रोज करताय का या चुका? हळूहळू हृदयाला पोहोचतंय नुकसान, हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या सवयी जाणून घ्या

Heart attack prevention: हार्ट अटॅकचा धोका केवळ वय किंवा आनुवंशिकतेवर अवलंबून नसतो. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अपुरी झोप, ताणतणाव आणि अतिमद्यपान यांचाही हृदयावर परिणाम होऊ शकतो. नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैलीमुळे धोका कमी करण्यास मदत होते.

Surabhi Jayashree Jagdish

बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, हार्ट अटॅक हा वाढत्या वयामुळे किंवा आनुवंशिकतेमुळे होतो. मात्र आपल्या रोजच्या सवयींचा हृदयाच्या आरोग्यावर किती मोठा परिणाम होतो याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान, अपुरी झोप आणि ताणतणाव हाताळण्याच्या चुकीच्या पद्धती यांचा परिणाम हळूहळू रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर आणि शरीराच्या वजनावर होतो. या सर्व गोष्टींमुळे पुढे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.

शारीरिक हालचालींचा अभाव ठरू शकतो धोकादायक

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजीचे कंसल्टंट डॉ प्रशांत नायर यांनी सांगितलं की, शारीरिक हालचाली कमी असणं हे हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. तासन्‌तास एकाच जागी बसून राहणं आणि नियमित व्यायाम न करणं या दोन्ही सवयींमुळे हा धोका वाढतो. याउलट रोज एक्टिव्ह राहिल्याने रक्तदाब, वजन, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

प्रौढ व्यक्तींनी आठवड्यातून किमान १५० मिनिटं मध्यम स्वरूपाचा व्यायाम किंवा ७५ मिनिटं तीव्र स्वरूपाचा व्यायाम करणं आवश्यक मानलं जातं. यासोबतच आठवड्यातून किमान दोन दिवस स्नायू मजबूत करणारे व्यायाम करायला हवेत. वेगाने चालणं, सायकल चालवणं, पायऱ्या चढणं आणि घरातील कष्टाची कामं करणं यांचाही शारीरिक हालचालींमध्ये समावेश होतो.

खाण्यापिण्याच्या सवयींकडेही द्या लक्ष

हृदयाच्या आरोग्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जास्त मीठ असलेले, प्रक्रिया केलेले, साखरयुक्त आणि आरोग्यासाठी अपायकारक फॅट्स असलेले पदार्थ सतत खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो, कोलेस्ट्रॉलचं संतुलन बिघडू शकतं आणि वजनही वाढू शकते.

याउलट आहारात पालेभाज्या, फळं, तृणधान्यं, कडधान्यं, सुका मेवा आणि मासे यांचा समावेश केल्यास हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. विशेष म्हणजे एखादा एकच पदार्थ पूर्णपणे चांगला किंवा वाईट असतो असं नाही. दीर्घकाळ आपण काय खातो आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत, हे अधिक महत्त्वाचं ठरतं.

धूम्रपान आणि ई-सिगारेटमुळे हृदयाला धोका

धूम्रपान, व्हेपिंग, ई-सिगारेट किंवा इलेक्ट्रॉनिक हुक्क्याचा वापर यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तंबाखूच्या धुरामुळे शरीरात जळजळ निर्माण होते. यामुळे पुढे हार्ट अटॅक किंवा पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता वाढू शकते.

जे लोक धूम्रपान करतात, त्यांनी ही सवय पूर्णपणे सोडणं हा हृदयाच्या आरोग्यासाठी घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. धूम्रपान सोडल्यानंतर काही वेळातच शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात.

अपुऱ्या झोपेमुळेही वाढू शकतो हार्ट अटॅकचा धोका

हृदयाच्या आरोग्याबाबत बोलताना झोप या महत्त्वाच्या गोष्टीकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. सतत अपुरी झोप घेणं किंवा झोपेचा दर्जा चांगला नसणं यांचा संबंध उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅकचा वाढत्या धोक्याशी आहे. बहुतेक प्रौढ व्यक्तींनी रात्री सुमारे ७ ते ९ तास शांत झोप घेणं आवश्यक असतं. तसंच रोज ठरलेल्या वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.

सततच्या ताणतणावाचाही हृदयावर परिणाम

अनेक व्यक्ती वर्षानुवर्षे मानसिक ताणतणावात जगत असतात. मात्र, या ताणाचा हृदयाच्या आरोग्याशीही संबंध असू शकतो, याकडे त्यांचे लक्ष जात नाही. सततचा मानसिक ताण आणि त्यावर योग्य उपाय न केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

इतकंच नाही, तर ताणतणावामुळे योग्य आहार घेणं, वेळेवर झोपणं आणि शारीरिकदृष्ट्या एक्टिव्ह राहणं यांसारख्या चांगल्या सवयी पाळणंही कठीण होतं. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी वेगाने चालणं, नियमित व्यायाम करणं, रिलॅक्सेशन थेरपी घेणं किंवा आपल्या जवळच्या माणसांसोबत वेळ घालवणं असे उपाय करता येतात. दीर्घकाळ या सवयी पाळल्यास हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.

अतिप्रमाणात मद्यपान करणं टाळा

अतिप्रमाणात मद्यपान करणे हादेखील हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. मद्यपानाचे प्रमाण कमी केल्याने हा धोका कमी करण्यास मदत होते. विशेषतः नियमितपणे जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींसाठी ही सवय बदलणे फायदेशीर ठरू शकते.

रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेची नियमित तपासणी करा

अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल पण उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण यांची अनेक वर्षे कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. हे धोके वेळीच ओळखून जीवनशैलीत योग्य बदल केल्यास आणि गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास आजार बळावण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. यासोबतच, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवल्याने दीर्घकाळ हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Walking Backward Benefits: गुडघेदुखीपासून मिळेल आराम? उलटे चालण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशाशी स्पर्धा करत वंदे भारतचा अविस्मरणीय प्रवास, श्रीनगर-जम्मू प्रवास फक्त ३ तासांवर, नंदनवनाच्या पर्यटनाला मिळणार चालना

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

Minister resignation news: मला मंत्रिमंडळातून मुक्त करा! केंद्रीय मंत्र्यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र, पदाचा आणि खासदारकीचाही दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT