Mi Savitribai Jotirao Phule: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांसमोर समाजसुधारणेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय घेऊन येत आहे. येत्या भागांमध्ये जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ असलेल्या क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांची मालिकेत भव्य एण्ट्री होणार आहे. या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडते झळकणार असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही व्यक्तिरेखा अधिक प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे.
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद अर्थात लहुजी राघोजी साळवे यांनी १८२२ साली ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी पुण्यात एक तालीम सुरू केली. या तालमीतून त्यांनी पुण्यातील तरुणांना शस्त्रविद्या व लष्करी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. याच तालमीत शस्त्र शिक्षण घेण्यासाठी जोतीराव फुले नियमित येत असत. त्यामुळे लहुजी वस्ताद आणि जोतीराव फुले यांचे नाते केवळ गुरु-शिष्याचे न राहता विचार, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक बनले.
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा त्यांना समाजाकडून तीव्र विरोध सहन करावा लागला. अशा कठीण काळात लहुजी वस्ताद हे फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पाठबळामुळेच फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार निर्भयपणे सुरू ठेवला. शिक्षण हे सर्वांसाठी असावे, विशेषतः अस्पृश्य बांधवांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी लहुजी वस्ताद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मालिकेतून लहुजी वस्ताद आणि जोतीराव फुले यांच्यातील हे प्रेरणादायी नाते प्रभावीपणे उलगडले जाणार आहे. हा ऐतिहासिक संदर्भ केवळ भूतकाळापुरता मर्यादित न राहता, सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे. समाजसुधारणेच्या या प्रेरणादायी प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर नक्की पहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.