'सैराट' चित्रपटातील 'सल्या' अभिनेता अरबाज शेख यांच्या वडिलांचे उपचारादरम्यान निधन
अस्लम शेख यांच्यावर ब्रेनहॅमरेजशी संबंधित गंभीर आजारावर उपचार सुरू होते
अस्लम शेख यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली
'सैराट' चित्रपटातील 'सल्या' ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर ब्रेनहॅमरेज संबंधित गंभीर आजारासाठी उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अस्लम शेख यांच्यावर सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने अरबाज सतत त्यांच्या उपचारासाठी धावपळ करत होता. वडिलांना वाचवण्यासाठी त्याने शक्य ते सर्व प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत, "मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे," अशी आर्त विनंती केली होती. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
याचदरम्यान अरबाजने संबंधित खासगी रुग्णालयावर उपचारासाठी वारंवार अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने संबंधित रुग्णालयातील मेडिकलवर कारवाई केली होती. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) पक्षानेही अरबाजच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. त्यांच्या सहकार्याने अस्लम शेख यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
डॉक्टरांनी उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. अस्लम शेख यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. या कठीण प्रसंगी अरबाज शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सर्व स्तरांतून शोकभावना व्यक्त करण्यात येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.