स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवारपासून म्हणजे १८ मार्चपासून 'घरोघरी मातीच्या चुली'(Gharoghari Matichya Chuli Serial) ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेमध्ये रेश्मा शिंदे (Reshma Shinde) आणि सुमित पुसावळे (Sumeet Pusavale) हे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही मालिका 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या वेळेवर सुरू करण्यात आली आहे. सोमवारी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला. हा एपिसोड पाहून अनेकांना ही मालिका आवडली तर काहींनी या मालिकेवरून टीका केली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा पहिला एपिसोड कसा वाटला असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला होता. यावर प्रेक्षकांनी कमेंट्स करत त्यांना ही मालिका नेमकी कशी वाटली याबाबत प्रतिक्रिया दिली. काहींनी या मालिकेने अपेक्षाभंग केल्याचे म्हटले आहे तर काहींना ही मालिका प्रचंड आवडली. स्टार प्रवाहच्या या पोस्टवर कमेंट्स करत एका प्रेक्षकाने लिहिले की, 'अतिशय भंपक आणि वाजवीपेक्षा अती बनावटी होता. खासकरून हृषीकेश रणदिवेने चिखलातून डुबणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रसंग तर कहर होता.एडीटिंग पूर्णच फसली हे स्पष्टच दिसून येत होतं.'
दुसऱ्या प्रेक्षकाने लिहिले की, '25 वर्षांच्या संसाराचं तुणतुणं वाजवणारी गेली आता 8 वर्षाच्या संसाराचं तुणतुणं वाजवणारी आलिये....no change' तिसऱ्या प्रेक्षकाने लिहिले की, 'अरे हे तर कहाणी घर घर की वाटतंय' तिसऱ्या प्रेक्षकाने लिहिले की, 'रेश्माच्या जागेवर दुसरं कोणी तरी पाहिजे होतं.' चौथ्या प्रेक्षकाने लिहिले की, 'पुन्हा पुन्हा तेच तेच काही तरी नवीन आणा की...' तर काहिंनी, 'या मालिकेची एवढं चांगले प्रमोशन करूनही अपेक्षाभंग झाला.', 'आई कुठे काय करते तरी बरं होतं.', 'कटकारस्थान अँड ऑल..थोडा प्रोग्रेसिव्ह हवा होता.', अशा कमेंट्स केल्या आहेत.
काहींना ही मालिका अजिबात आवडली नाही. तर काही जण ही मालिका चांगली असल्याचे म्हणत आहेत. एका प्रेक्षकाने लिहिले की, 'घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा पहिला एपिसोड खूप छान होता.' तर दुसऱ्याने लिहिले की, 'मस्त आहे सिरीअल, आणि तू पण खूप भारी आहेस.' आणखी एका प्रेक्षकाने लिहिले की, 'अतिशय छान होता...माझा दोन वर्षांचा मुलगा खायचं सोडून सिरिअल बघत होता.' तर काहिंनी, 'अशीच फॅमिली पाहिजे', 'ब्लॉकबस्टर', 'पहिला एपिसोड आवडला.', असा कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेमध्ये सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, सुमित पुसावळे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर बालकलाकार आरोही सांबरे देखील या मालिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. तर राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.