Dharmaveer 2
Dharmaveer 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2 : CM एकनाथ शिंदे 'धर्मवीर २' चित्रपटात झळकणार? चर्चांना उधाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्वेता भालेकर परब, साम टीव्ही, वृत्तनिवेदक

'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. चर्चा नेमकी कुठून सुरु झाली ? तर मुंबईतल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नुकतंच 'धर्मवीर 2' चं पोस्टर प्रदर्शित झालं. या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते.

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर याची खास उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सिनेमाचं, प्रसाद ओकचं कौतुक केलं.

या सिनेमाला एकनाथ शिंदेंचं मोलाचं सहकार्य लाभलं म्हणून सर्वांनी त्यांचं, मुख्यमंत्री म्हणून ते बजावत असलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. हे बोलणं सुरू असताना सचिन पिळगावकर यांनी काही संकेत दिले आणि चर्चेला फोडणी मिळाली. चित्रपटात तुम्ही काम केलं नाही, त्याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही, असं सचिन पिळगावकर म्हणाले तेव्हा बाजूने 'चित्रपटात आहेत' असं कुणीतरी म्हटलं तेव्हा चित्रपटात आहात, मग हे कधी सांगणार? इंडस्ट्री मधला मी सिनियर ऍक्टर म्हणून तुमचं स्वागत करतो, असं म्हणत सचिन पिळगावकर यांनी स्पष्ट संकेत दिले. आता धर्मवीर 2 मध्ये एकनाथ शिंदे हे पाहुणे कलाकार असणार का? की त्यांनी त्यात भूमिका वठवली आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांसोबत त्यांच्या समर्थकांनाही लागली आहे. 'धर्मवीर' च्या पहिल्या भागात क्षितिज दातेनं एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती.

आनंद दिघे यांची भूमिका पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य प्रसाद ओकनं लिलया पेललं. आता 'धर्मवीर 2' मध्येही प्रसाद ओक दिघेंची भूमिका साकारणार आहे. पण 'अरे एकनाथ' अशी हाक मारल्यावर शिंदेंच्या भूमिकेत शिंदे स्वतः दिसणार की क्षितिज शिंदेंच्या भूमिकेत पुन्हा पाहायला मिळणार याची कमालीची उत्सुकता आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. सत्तांतर झालं आणि शिंदेंच्या नेतृत्वात नवं सरकार आलं त्या मागचे हिरो एकनाथ शिंदेचं ठरले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक, दिघेंचा वारसा घेऊन इतरांसाठी जगणाऱ्या एकनाथाची म्हणजेच स्वतःचीच भूमिका वठवून ते हिरो ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. " हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही " असं वाक्य पोस्टरवर आहे. त्यामुळे सिनेमात नेमके कोणकोणते प्रसंग असणार, याबद्दलही सर्वांना उत्कंठा आहे. " आताचा एकनाथ शिंदे आणि पूर्वीचा एकनाथ शिंदे लोकांसाठी काय करत होता, हे या सिनेमात दाखवलं आहे, हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे पण सगळंच खरं दाखवू शकत नाही ", असंही शिंदेंनी यावेळी मिश्किलपणे सांगितलं. मी मुख्यमंत्री नाही तर राज्याचा सेवक आहे.

आनंद दिघे माझे गुरु आहेत. पावलोपावली त्यांची आठवण येते. त्यांचे शब्द आजही कानावर पडल्यासारखे वाटतात, अशा भावनाही शिंदेंनी या सोहळ्यात व्यक्त केल्या. दिघेंच्या सिनेमाला सहकार्य करणं, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असं शिंदे सांगतात. त्यामुळे सिनेमाच्या माध्यमातून का होईना, ऑनस्क्रीन गुरु - खरा शिष्य यांची भेट होते का? हे पाहावं लागेल.

विशेष म्हणजे 30 जून 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आणि त्याच मुहूर्तावर 'धर्मवीर 2' चं पोस्टर प्रदर्शित केलं गेलं. मंगेश देसाई सिनेमाचे निर्माते आहेत तर कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शनाची धुरा प्रवीण तरडे वाहत आहेत. इतर कलाकारांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. पण टीम तगडी असणार यात शंका नाही. आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित 'धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा प्रचंड गाजला. 2022 साली सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला. अनेक पुरस्कार मिळाले. उत्तम अभिनयासाठी प्रसाद ओकचंही कौतुक झालं आणि चित्रपटाची ही टीम पुन्हा सज्ज झाली आहे. येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनाचं औचित्य साधत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात जर एकनाथ शिंदेंचा अभिनय पाहायचा असेल तर थोडी वाट पाहावीच लागणार ना..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: बाईकवरून खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, संतप्त स्थानिकांचा रास्ता रोको

Mumbai Rain News : मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढील ३-४ तास धोक्याचे, काम असेल तरच घराबाहेर पडा; IMD कडून हायअलर्ट

Dharashiv News : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद

Marathi Live News Updates : कोकणात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! जनजीवन विस्कळीत, ट्रेन रद्द; कुठे किती पाऊस पडला? Photo

SCROLL FOR NEXT