बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी तीन दशकाहून अधिक काळ त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिताभ बच्चन यांनी ७०-८० चा काळ चांगलाच गाजवला. अमिताभ बच्चन यांना मानणारा चाहतावर्ग मोठा आहे. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अनोखं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशातच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मराठी शब्द चुकीचा बोलल्याने त्यांनी माफी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी मराठी भाषेतला त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये मराठीमध्ये अमिताभ बच्चन हे "मी कचरा करणार नाही" असे मराठीतच म्हणाले होते. पण हे शब्द बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून चूक झाली असल्याचे त्यांच्या मित्राने त्यांना सांगितले. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा व्हिडीओ करत आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहे की, "नमस्कार मी अमिताभ बच्चन. काही दिवसांपूर्वी मी व्हिडीओ केला होता. की 'मै कचरा नही करूंगा' हे मी मराठीमध्ये बोललो होतो. या व्हिडीओमध्ये मी कचरा हा शब्द चुकीचा बोललो होतो. माझा मित्र सुदेश भोसलेने मला हे सांगितलं, की तुम्ही कचरा हा शब्द चुकीचा बोलला आहे. म्हणून मी हा व्हिडीओ परत करतो आणि म्हणतो, 'की मी कचरा करणार नाही.' धन्यवाद."
सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर अमिताभ बच्चन यांनी व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये, "मी एका व्हिडीओमध्ये चुकीचा उच्चार केल्याने दुरूस्त करत आहे. क्षमस्व" असं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ पाहून सर्वंचजण त्यांचे कौतुक करत आहे. मराठी शब्द चुकीचा बोलल्याने त्यांनी हा व्हिडीओ करत माफी मागितली आहे. बॉलिवूडसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.