आई नऊ महिने आपल्या पोटात बाळाला अगदी तळहातासारखं जपते आणि जन्मानंतरही त्याला प्रत्येक क्षण पाहण्याची, जपण्याची आस धरत असते. मात्र एका आईने चक्क आपल्या 5 वर्षाच्या पोटच्या लेकाला घराच्या छतावरून फेकून दिल्याची घटना एप्रिल 2023 मध्ये घडली होती. या प्रकरणात मध्यप्रदेश येथील ग्वालियर न्यायालयाने आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तिच्या नवऱ्यानेच या संदर्भातील पुरावे न्यायालयात सादर केले होते. तर या घटनेतील तिचा प्रियकर मात्र निर्दोष सुटला आहे.
नेमकी घटना काय?
ज्योती राठोडचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तिसोबत प्रेमसंबंध होते. ते अनेकवेळा एकमेकांना भेटत असायचे. असेच एक दिवस त्या लहान मुलाने आपल्या आईला प्रियकराच्या मिठीत पाहिले. आपले अनैतिक संबंध आता नवऱ्याला देखील समजतील आणि मुलगा हे सांगू शकतो. या भीतीने ज्योती राठोड आणि तिच्या प्रियकराने मिळून मुलाला दोन मजल्यांवरून खाली फेकून दिले.
खाली पडताच तो चिमुकला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. धक्कादायक बाब म्हणजे ज्योती राठोड मुलाला पाहण्यासाठी रुग्णालयात एक दिवस सुद्धा गेली नाही. मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जयारोग्य रुग्णालयात त्याच्यावर एक दिवस उपचार सुरू होते. मात्र 29 एप्रिल रोजी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मुलाचा छतावरून पाय घसरून मृत्यू झाला असेल असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता. त्यामुळे कुठलीही संशयाची कुणकुण पोलिसांना लागली नव्हती. 15 दिवसांनी आई ज्योती राठोडला केलेल्या पापाचा पश्चाताप झाला. तिने आपल्या नवऱ्याला सांगितले की माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे, असे सांगताच नवरा ध्यान सिंहला संशय आला त्याने तिला विश्वासात घेऊन विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ती ढसाढसा रडू लागली आणि तिने संपूर्ण चूक पतीसमोर कबूल केली.
नवऱ्याने मोठ्या चालाकीने या सगळ्याची रेकॉर्डिंग करून ठेवली. तसेच घरातल्या सीसीटीव्हीमधील फुटेज काढले आणि सर्व पोलिसांकडे दिले. त्याआधारे ज्योती राठोडच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि न्यायालयात आरोपपत्र सादर केले. घटनेचा सखोल तपास सुरू झाला आणि कोर्टाने ज्योती राठोडला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र ठोस पुरावे नसल्याने तिच्या प्रियकराची निर्दोष मुक्तता केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.