भाड्याचे घर सोडण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे
घरमालकाला चावी देण्यापूर्वी घराचे फोटो आणि व्हिडीओ काढा
घरामध्ये राहत असताना ते घर सोडताना काही तोडफोड झाली नसेल तर दाखवता येते
भाड्याचे घर रिकामे करताना वीज मीटरचा फोटो काढावा
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेकदा काही जण भाड्याचे घर सोडताना आपले सामान पॅक करण्याची आणि घर स्वच्छ करण्याची खूप घाई करतात. घर सोडल्यानंतर आपली जबाबदारी संपली असे अनेकाना वाटते आणि ते घराच्या चाव्या मालकाला लगेच देऊन टाकतात. पण घर सोडण्यापूर्वी काही मिनिटं वेळ काढून संपूर्ण घराचे फोटो आणि व्हिडीओ काढणे खूप फायदेशीर ठरू शकते.
घडतं असं की, अनेक वेळा भाड्याचे घर रिकामे केल्यानंतर घर कोणत्या स्थितीत सोडले आहे यावरून घरमालक आणि भाडेकरू यांच्यात अनेकदा वाद होतात. भिंतीवर डाग असणे, आधीच काही तरी नुकसान झालेले असणे आणि घर खाली करण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही नुकसान होणे या सर्व गोष्टींमुळे नंतर वाद होऊ शकतो. त्यामुळे घर रिकामे करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तुम्ही काढलेले फोटो आणि व्हिडीओ पुरावा म्हणून तुमच्या उपयोगी पडेल.
घर सोडण्यापूर्वी फक्त काही फोटो काढणे पुरेसे नाही. तर घरातील प्रत्येक खोलीचे व्यवस्थित फोटो आणि व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करा. भिंती, फरशी, छत, दरवाजे आणि खिडक्या यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करा. जर आधीपासून काही नुकसान किंवा डाग असतील तर त्याचे वेगळे एकत्रित फोटो घ्या. यामुळे नंतर आधीपासून असलेले नुकसान ओळखणे सोपे होईल. तुम्ही राहत असताना हे नुकसान नाही झाले हे तुम्हाला घरमालकाला पटवून सांगता येईल.
तुम्ही घर सोडताना तुमच्या वीज आणि पाण्याच्या मीटर रीडिंगचे फोटो काढणे गरजेचे असते. फोटोंमध्ये मीटर रीडिंग स्पष्टपणे दिसले पाहिजे. शक्य असल्यास फोटोंसोबत तारीख आणि वेळेची नोंद करून ठेवा. यामुळे तुम्ही घर सोडताना मीटरचे रीडिंग किती होते हे ठरवण्यास तुम्हाला मदत होईल. नंतर तुम्हाला तुमच्या वीज किंवा पाण्याच्या बिलांबद्दल काही प्रश्न पडल्यास ही नोंद उपयोगी पडू शकते.
अनेक भाड्याच्या घरांमध्ये पंखे, बल्ब, एसी, गिझर, कपाटे, पडदे, स्वयंपाकघरातील भांडी किंवा इतर उपकरणे आधीच बसवलेली असतात. घर सोडताना या उपकरणांचे फोटो आणि व्हिडिओ घ्या. विशेषतः ज्या वस्तू भाड्याने घेताना घरमालकाला सांगितल्या होत्या त्यांचे फोटो जपून ठेवा. जर एखादी वस्तू आधीच तुटलेली असेल तर तिचा व्हिडिओ काढून तुमच्याकडे ठेवा. घर सोडताना तुम्ही तो व्हिडीओ दाखवू शकता.
साफसफाई करून आणि सामान बाहेर काढल्यानंतर संपूर्ण घराचा व्हिडिओ घेणे ही एक खूपच चांगली कल्पना आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये प्रत्येक खोली घरमालकाला दाखवू शकता. त्यानंतर घरमालकाच्या हातात घराच्या चाव्या सुपूर्द करा. चाव्या सुपूर्द करण्याच्या तारीख आणि वेळेबद्दल नंतर काही वाद निर्माण झाल्यास त्याची नोंद ठेवा. म्हणजे, घरमालकाला चाव्या सुपूर्द केल्यानंतर घर रिकामे झाल्याची खात्री तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.