दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्नाटक आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्य सरकारांनी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या राज्यांमधल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आला. याआधी केंद्र सरकारसह अनेक राज्यांनीही DA आणि DR मध्ये वाढ जाहीर केली होती.
कर्नाटक सरकारने ५ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २.५ टक्क्यांची वाढ जाहीर केली. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १५.५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर पोहोचला. ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव DA सोबत जुलैपासूनची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे.
अरुणाचल प्रदेश सरकारनेही सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत (DR) ३ टक्क्यांची वाढ जाहीर केली. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा DA ६० टक्क्यांवरून ६३ टक्के झाला. ही वाढसुद्धा १ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आली.
केंद्र सरकारने २०२६ मध्ये दोन टप्प्यांत महागाई भत्त्यात वाढ केली. जानेवारी २०२६ मध्ये २ टक्के, तर जुलै २०२६ च्या टप्प्यात ३ टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ६३ टक्क्यांवर पोहोचला.
दिवाळीआधी तमिळनाडू, राजस्थान, हरियाणा आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांनीही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळत आहे.