Suvarna Dhanorkar  Saam tv
ब्लॉग

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Saam Tv

'चीनी कम'मधली तब्बु आठवते? अमिताभच्या हॉटेलमधून बाहेर पडली की टर्नवर जाताच लांबसडक केसांना एक छान झटका देऊन मागे वळून बघते. अमिताभला एक प्रेमळ लूक देते आणि पुढे जाते. ती लांब केसांची तब्बू 'तिला' प्रचंड आवडलेली. मुलगी असून 'तिला' जर ती आवडली, तर मग मुलांना किती आवडली असेल विचार करा!.

कुठल्याही मुलाला लग्नासाठी कशी मुलगी हवी हे विचारा! एकवेळ गोरी मुलगी हवी असं म्हणणार नाही, पण लांब केसांची मुलगी हवी असे म्हणणारच. यातून मुलींचे लांब केस तिच्यासाठी आणि तिच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकासाठी किती महत्त्वाचे ते लक्षात येतंच. (म्हणूनच पूर्वी पतीच्या निधनानंतर केशवपन करत. त्या स्त्रिला विद्रूप करत) पण ज्यांच्या डोक्यावरचे केस क्षणाक्षणाला गळून पडतात त्यांचं काय?....

कॅन्सर. असा आजार ज्यात डोक्यावरचेच नाही तर अंगावरचे केसही अक्षरश: गळून पडतात. आजाराने शरीर पोखरत असतानाच डोक्यावरचे झडणारे केस आत्मविश्वास कमी करत जातात, मनही पोखरतात. काहींच्या मनात फक्त त्या गळलेल्या केसांमुळे आत्महत्येचे विचारही येतात. खरंच, काय मानसिक स्थिती होत असेल हातात येणारे केस पाहून?...

स्त्रीचं खरं सौंदर्य तिच्या केसात आणि हेच केस नसले की ती विद्रूप होते असा सर्वसाधारण समज...यामुळेच कदाचित कुठलीही स्त्री केस कापायला नाही म्हणते. टकले पुरूष डोळ्यांना सरावलेत. पण टकल्या स्त्रिया नाहीच. म्हणूनच या कॅन्सरग्रस्त मुली-स्त्रियांसाठी 'ती'न' केशदानाचा निर्णय घेतला.

'तिला' वाटलं किती सुंदर दिसतो आपण लांब केसांमध्ये आणि ते केस मोकळे ठेवले की आपलं सौंदर्य आणखीनच खुलतं. पण एक दिवस असंच स्वत: आरशात न्याहाळताना जाणवलं प्रत्येकीच्या वाट्याला हे सौंदर्य येतं का...धडधड वाढली. मन भरून आलं. अचानक आठवलं आपल्या एका मैत्रिणीला कॅन्सर झालाय. आणखी एका मैत्रिणीच्या आईला केमो सुरुयत. एका सहकाऱ्याची बायको कॅन्सरनं गेली. ही लिस्ट वाढत होती आणि या सगळ्यांसाठी काहीतरी करावं असं वाटलं.

Suvarna dhanorkar

एका मैत्रिणीच्या आईनं केमोनंतर विग घेतला. तो लावताना तिचे डोळे भरून यायचे. पण जुनाच आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर झळकायचा. पण ज्या गरीब स्त्रिया किंवा मुली असतील, त्यांचं काय? त्यांना हे विग अफोर्डेबल आहेत का? उत्तर शोधलं तर कळलं नाही. किमान २०-२५ हजारांपर्यंत विग मिळतो. वर त्याचा मेंटेनन्स.

खर्चिक उपचारांसोबत हा खर्च कसा परवडणार म्हणून 'तिच्या' मनात आलं आपण आपले केस दान करूया. एखाद्या अनोळखी मुलीच्या डोक्यावर हा विग चढला की तिचा आत्मविश्वास दुणावेल, तिचा चेहरा खुलून जाईल या विचारानं ती हरखून गेली. तिचा निर्णय पक्का झाला.

अॅप्रोच हेल्पिंग हॅन्ड्स फाऊंडेशनमध्ये (https://approach.org.in/about-us/) संपर्क साधला. या संस्थेनं २०१६ पासून गोरगरीब कॅन्सरग्रस्तांसाठी मोफत विग बनवून द्यायला सुरुवात केलीय. म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. आजवर केवळ १२५ जणींनी केशदान केलंय. त्यातून ३० विग तयार करून गोरगरीब गरजूंपर्यंत पोहचलेयत. पण कॅन्सरग्रस्तांचा आकडा आणि केशदान करणाऱ्यांचा आकडा यात किती तफावत. ही तफावत दूर करायची तर लांब केस असणाऱ्या महिलांमध्ये जागृतीची गरज आहे.

नवऱ्याला 'तिनं' इच्छा बोलून दाखवली. त्याचा प्रश्न 'हे करायलाच हवं का? इतके लांब केस कापणार तू...? इतर काही वस्तुरूपात दान कर..' 'तिचं' उत्तर 'सगळंच दान करता येईल मनात आल्यावर. पण केशदान रोज करता येण्यासारखं नाही... आणि यासाठी पटकन कुणी धजावणारही नाही. प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करायचंय आणि ते इतरांनीही करावं म्हणून त्यांना तयार करायचंय.’

नवऱ्याला मुद्दा पटला. पण एक अडचण होतीच 'गेली १९ते २० वर्ष आपल्याला स्क्रीनवर पाहणारे लोक डोक्यावर केस नसलेली अँकर पाहतील का...?’ म्हणून लागलीच सरांची भेट घेतली त्यांना इच्छा बोलून दाखवली त्यावेळी त्यांचा पहिलाच प्रश्न 'कशाला...?’ मग त्यांना मुद्दा पटवून दिल्यावर त्यांनीही होकार दिला.

केशदानासाठी केसांची लांबी किमान १३ इंच असावी लागते. 'तिचे' केस १४ इंच. १३ पैकी एक ते दीड इंच केस विगसाठी बेसमध्ये टाचले जातात. खालचे केस लहान-मोठे असतील ते नीट सरळ कापून मग वापरता येतात. एका विगसाठी किमान ३ जणींचे केस लागतात. त्यातही प्रत्येकीच्या केसांचा पोत वेगवेगळा. त्यामुळे जवळपास सारखे केस मिळेपर्यंत विग बनवता येत नाही. पण एकदा विग बनला की तो किमान १५ वर्षे टिकतो. अॅपरोच हेल्पिंग हॅन्ड्स फाऊंडेशननं पुण्यातल्या पॅपिलॉन हेअर वर्ल्ड कंपनीशी करार केलाय. त्यांच्याकडून गरीबांसाठी सबसिडाईज्ड रेटवर विग बनवून दिले जातात. मग ते फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहचतात. कधी-कधी काही विग हे कस्टमाईज्ड असतात. त्यांच्याकडून विगसाठी संस्था पैसे घेते.

इकडे दादरच्या नॅशनल हेअरक्राफ्ट सलूनमध्ये केशदानाची सगळी तयारी झाली. तो क्षण आला आणि 'तिची' हुरहुर वाढली. हेअर एक्सपर्ट तुषार चव्हाण यांनी चांगलीच दिसशील असा विश्वास दिला. एवढंच नाही तर यासाठी त्यांनीही खारीचा वाटा उचलला. एक रुपयाही न घेता दोन-अडीच तास वेळ देऊन मोफत केस कापून दिले. हे सगळं होत असतानाही ती सहज वावरत होती पण 'पूर्ण केस काढल्यावर कसे दिसू आपण...?’ हा विचार मनात होता. लगेच त्या सगळ्या अनोळखी मुली दिसल्या. 'तिला' वाटलं त्या 'तिच्याच' लांब केसांकडे बघतायत. मन भरून आलं. डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

एक-एक बट कापणं सुरू होतं. ज्यावेळी सगळ्या बटा कापून झाल्या 'तिला' खूप हलकं वाटलं. आपण समाजाचं देणं लागत असताना नेहमी वस्तूरुपात काही ना काही गरजूंपर्यंत पोहचवतो. पण आज आपण जे केलंय, ते फार वेगळं आहे हे 'तिच्या' लक्षात आलं. यावर मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांच्या रिअॅक्शन खूप विचित्र किंवा अगदीच शॉकिंग असतील याची 'तिला' जाणीव होती; पण 'ती' खूश होती. 'ती' आणि आणखी एक दोन जणींनी केशदान केले की एक छानसा विग तयार होईल आणि एका मुलीच्या डोक्यावर तो चढेल. तिचं सौंदर्य आणखी खुलेल. तिचा आत्मविश्वास वाढेल. शाळेत/कॉलेजमध्ये जाताना ती पुन्हा आनंदान केस विंचरेल आणि घरातून बाहेर पडेल त्यावेळी तिचं सौंदर्यही सर्व जण न्याहाळतील. ज्यांचे हे केस, त्यांना ती मनोमन धन्यवाद देईल.

हे सगळे विचार 'तिच्या' मनात येत होते. त्याचवेळी तिरुपतीला होणारं केशदान आठवलं. वर्षाकाठी किमान २०० कोटींचा फक्त दान केलेल्या केसांचा व्यवहार...हा समोर आलेला आकडा... कदाचित हा आकडा यापेक्षा अधिक असेल. रोज टनांनी केस दान होतात तिरुपतीला. ते खरंच गरजूंसाठी कितपत उपयोगात येत असतील...म्हणून अॅप्रोच हेल्पिंग हॅन्ड्ससारख्या संस्था महत्त्वाच्या वाटतात, आणि हे केशदानंही...

इतका वेळ तुम्ही विचार करत असाल ही 'ती' कोण... ही 'तीच' जी रोज सकाळी तुमच्यापर्यंत साम टीव्हीच्या माध्यमातून बातम्या घेऊन येते... सुवर्णा धानोरकर.

सकाळ माध्यम समूह समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतं. नेहमी सकारात्मक बातम्यांच्या माध्यमातून प्रबोधन तर करतंच, पण सर्वसामान्यांच्या आयुष्यातील विविध अंगांनाही स्पर्श करणारे उपक्रमही विविध माध्यमांतून राबवतं. याच सामाजिक जाणीवेतून कॅन्सरग्रस्त मुली आणि महिलांसाठी महत्वाचा असा केशदानासारखा निर्णय घेतला.
- सुवर्णा धानोरकर, अँकर, साम टीव्ही

सुवर्णाचं तुम्हा सर्वांना सकाळ समूहाच्या माध्यमातून आवाहन आहे, शक्य असल्यास तुम्हीही केशदान करा. एखाद्या गरीब कॅन्सरग्रस्त मुलीपर्यंत त्याचा विग पोहचू द्या...कारण प्रत्येकीला सुंदर दिसण्याचा सुकेशिणी होण्याचा अधिकार आहे.

(ऍप्रोच हेल्पिंग हॅन्डस संस्थेचे वॉलेंटिअर - शिशीर जैन-८२७५३९४८८६, संकेत-७७०९६६९४९५ या संस्थेचे वॉलेंटियर्स मुंबई, पुणे, नागपूर, सांगली आणि राज्यातल्या इतर महत्त्वाच्या शहरांमध्येही आहेत. शिवाय ही संस्था राज्याबाहेर बिहारमध्येही काम करतेय.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT