mla house  Saam tv
ब्लॉग

आमदाराच्या गळक्या घराची गोष्ट

affordable housing scheme for mla : अन् अखेर जनरेट्यापुढं सरकार झुकलं. त्यानंतर सरकारने आमदाराला गावी नाही तर मुंबईत अवघ्या साडेनऊ लाखात घर देण्याचं जाहीर केलं.

Vishal Gangurde

डोंगराच्या कुशीत उंबरवाडी हे छोटंसं गाव. गाव तसं साधंच...गरिबीने पिचलेलं... पण आमदाराचं गाव असल्यामुळं अख्ख्या तालुक्यात गावाचं नाव...याच गावाच्या शेतात ओढ्याच्या कडेला आमदाराचं घर... त्याला घर कसलं म्हणताय... अगदी दहा पत्र्यांचं खुराडंच... याच घराच्या दारात आमदाराचं पोरगं खेळत होतं. आमदाराची बायको चूल पेटवण्यासाठी सरपण तोडत होती आणि आमदार महोदय पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी फायलींचा गठ्ठा घेऊन बसले होते. मात्र अचानक आभाळ भरून आलं. सोसाट्याचा भयाण वारा सुटला. धडकी भरावी अशी काळ्याकुट्ट ढगांची भिंत मावळतीला तयार झाली आणि त्यात सूर्य गुडूप झाला. त्यामुळंच दिवस मावळायला दीड दोन तास बाकी असताना सगळीकडं झाकाळून गेलं.

आभाळाची फळी आणि घों घों वाऱ्यासह घोंघावत येणाऱ्या पावसामुळं आमदाराच्या मनात भीतीची लहर उठली होती. कारण यंदाचा उन्हाळा सगळा लोकांची कामं करण्यात गेला होता. बायकोने कितीतरी वेळा सांगूनसुद्धा घराचे गंजलेले गळके पत्रे बदलले नव्हते. एवढंच काय तर पत्र्याच्या खालचे आडूसुद्धा नीट बांधून घेणं जमलं नाही. त्यामुळं आता पाऊस आला तर बायको आणि पोराला घेऊन कुठं जायचं? घरातल्या समानाचं काय करायचं? आणि वाऱ्यामुळं पत्रे उडाले तर............या प्रश्नांनी आमदाराच्या मनात काहूर उठलं होतं... आणि तोच पाऊस टिपकला.... बघता बघता पावसाने रौद्र रूप धारण केलं आणि पाऊस उन्मत्त हत्तीसारखा धो धो कोसळू लागला. आमदार बायको पोरासह घरात शिरला....

जत्रेत ताशा वाजावा तसाच पत्र्यावर पावसाच्या धारांचा आवाज येत होता... हळूहळू आवाज वाढत गेला...डोक्यावरचं संकट सरावं म्हणून आमदार विठ्ठलाचा धावा करायला लागला.... विठ्ठला वाचव रं बाबा.... अशी विनवणी करायला लागला... मात्र आज विठ्ठलही आमदाराच्या हाकेला आव देत नव्हता... कारण विठ्ठलाला बी कदाचित पावसाळी अधिवेशनाला जायचं असेल... पण आता आमदाराचा स्वर कातर कातर व्हायला लागला होता.... पुढं काय संकट वाढून ठेवलंय ते स्पष्ट दिसायला लागलं होतं. तेवढ्यात पावसाचा जोर आणखी वाढला... आणि अचानक  वाऱ्याचा मोठा झपका आला. वाऱ्याच्या झपक्याने पत्र्यासह आडू सरकला....आणि पावसाचं पाणी थेट आमदाराच्या घरात शिरलं. हे पाणी बघून आमदाराच्या काळजाचं पाणी पाणी झालं.......

आमदाराच्या बायकोने स्वतःला सावरत घरातली भांडी पत्र्याच्या धारेखाली लावायला सुरुवात केली. पण गळणारं पाणी जास्त होतं. हंडा, बादली, टीप, ड्रम सगळं लावलं तरी पावसाचं पाणी पुरून उरत होतं. आमदार, त्याची बायको आणि पोरगं रात्रभर गळणाऱ्या पत्र्याखाली भांडी बदलत होते. देवा पाऊस थांबव रे म्हणून हात जोडत होते. पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता.... राक्षसाने धुमाकूळ घालावा तसा पाऊस थैमान घालत होता. पत्र्यातून गळणारं पाणी घरभर पसरलं होतं. पाय ठेवायलाही कोरडी जागा उरली नव्हती....

.सगळा संसार पाण्यानं भिजला होता. डोकं कोरडं करावं तर त्यासाठीसुद्धा वीतभर कापड कोरडं नव्हतं..... मात्र रात्र जसजशी सरत आली तसा पावसाचा जोर कमी व्हायला लागला.... आणि पहाटे पाऊस उघडला... पण थोडावेळ अंग टाकावं अशी परिस्थितीच नव्हती... पाऊस उघडला असला तरी वाऱ्याची झुळूक अंगावर काटा आणत होती. तशातच बाप लेक आणि आई तसंच काकडत दिवस उगवायची वाट बघत होते. त्याशिवाय त्यांच्याकडं दुसरा पर्यायही नव्हता..... अखेर दिवस उगवला आणि आमदाराने सुटकेचा निःश्वास सोडला. कोणाकडून का होईना पण काहीतरी मदत मिळेल, हा विश्वास त्याला होता.... पण गावात नाव तर राखायचंय, आणि घरातलं पाणी बी झाकायचंय, अशा दुहेरी कोंडीत आमदार सापडला होता.

दिवस उगवला तसं आमदाराच्या बायकोने त्याला आवाज दिला. बाहेर जायच्या आधी भिजलेलं सामान काढू, असं म्हणत आमदाराच्या बायकोने आदेश सोडला... आता आमदार महोदय बायकोच्या शब्दापुढे काय बोलणार..... त्यांनी गप गुमान भिजलेल्या वस्तू बाहेर वाळायला टाकायला सुरुवात केली. घरातल्या सगळ्या वस्तू भिजल्या होत्या. धान दळण भिजलं होतं. अधिवेशनासाठी घेऊन जायच्या फायलीसुद्धा ओल्या झाल्या होत्या. त्यामुळं आता आमदार महोदय आणि त्यांची बायको हा सगळा संसार वाळू घालत होते. तेवढ्यात एक हिंडफिरा पत्रकार वाट वाकडी करून चिखल तुडवत आमदाराची गाठ घ्यायला आला. तसं आमदार अधिवेशनात तालुक्याचे कोणते प्रश्न मांडणार वैगेरे हेच त्याला जाणून घ्यायचं होतं. पण जसा पत्रकाराने आमदाराच्या दारातला वाळू घातलेला संसार बघितला तसं त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आमदाराची वाईट परिस्थिती बघून त्याचे शब्द गोठून गेले.....आणि त्याने फक्त दोन फोटो घेतले आणि काहीच न बोलता निघून गेला..

दुसऱ्या दिवशी पेपरच्या पहिल्या पानावर आमदाराची करुण कहाणी छापून आली. फोटो पाहून कित्येकांनी हळहळ व्यक्त केली. तर मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या घरासाठी तातडीने पावलं उचलणार असल्याचं जाहीर केलं. लाखो भिजून मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा कोरडा राहिला पाहिजे, अशी सिंहगर्जना सभागृहात करण्यात आली.

शेवटी जनरेट्यापुढं सरकार झुकलं.... आणि सरकारने आमदाराला गावी नाही तर मुंबईत अवघ्या साडेनऊ लाखात घर देण्याचं जाहीर केलं. सरकारने फक्त घोषणाच नाही तर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीत आमदाराला घरसुद्धा मंजूर केलं... शेवटी दीनदुबळ्या, वंचित आणि गरिबीने पिचलेल्या आमदारांना स्वस्तात घरं मिळवून देण्याची लढाई लढलेल्या आणि कर्जापायी गळ्याला फास लावून घेणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा आमदाराच्या डोक्यावर छत आल्यानं कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT