वाकडमध्ये अल्पवयीन मुलगा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल
वडील मागे बसल्याने पालकांच्या जबाबदारीवर प्रश्न
नागरिकांकडून संताप, कडक कारवाईची मागणी
वाहतूक नियमांचा भंग
दिलीप कांबळे, मावळ
लहान मुलांना नेहमी मोठ्या गोष्टींचे आकर्षण असते. या आकर्षणाचं हट्टामध्ये रूपांतर झालं, तर मात्र काही खरं नाही. अशीच एक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. सरकारने अनेकदा बजावून देखील अल्पवयीन मुलांच्या हातात सर्रासपणे वाहन चालवण्यासाठी दिली जातात. पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरातील फिनिक्स मॉल समोरील मुख्य रस्त्यावर एक अल्पवयीन मुलगा ऑटो रिक्षा चालवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, अल्पवयीन मुलगा रिक्षाच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून वाहन चालवत आहे, तर त्याचे वडील मागील सीटवर निर्धास्तपणे बसलेले आहेत. रस्त्यावर इतर वाहनांची वर्दळ असताना देखील हा प्रकार सुरू असल्याचे पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून, त्या चिमुकल्याच्या जीवाशी आणि इतर नागरिकांच्या सुरक्षेशीही खेळ करणारा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
“जर या मुलाकडून एखादा अपघात झाला असता, तर त्याला जबाबदार कोण?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच, शहरातील इतक्या गर्दीच्या रस्त्यावर असा प्रकार घडत असताना वाहतूक पोलीस नेमके काय करत होते, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वाहतूक नियमांनुसार, अल्पवयीन मुलांना कोणतेही वाहन चालवण्याची परवानगी नाही. तरीदेखील अशा प्रकारे पालकांनीच निष्काळजीपणा दाखवत मुलाला वाहन चालवायला देणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेमुळे पालकांच्या जबाबदारीवर आणि प्रशासनाच्या सतर्कतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नागरिकांकडून संबंधित वडिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा पिंपरी-चिंचवडकर व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत असून, सोशल मीडियावरही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारांविरोधात आवाज उठवणे आणि कायद्याचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.