
मुंबई : मुंबई म्हटलं येथे सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. कामगारांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कामाची कितीही धावपळ असली तरी मुंबईकर सण साजरे करायला विसरत नाहीत. अनेक जण प्रवासाच्या वेळेचा सदुपयोग करत लोकल ट्रेनमध्ये सण साजरा करताना दिसतात. दररोजच्या प्रवासामुळे चांगली मैत्री झालेल्या प्रवाशांचा ग्रुप लोकल ट्रेनमध्येच वर्षभरातील सर्वच सण साजरे करतो. संपूर्ण जगात उत्साहाने साजरा होणाऱ्या या ख्रिसमस सणाच्या धामधुमीत लोकल ट्रेनच्या गर्दीतही सांताक्लॉजचा वेशात एका व्यक्तीने प्रवास केला. या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे.
देशातील कानाकोपऱ्यात ख्रिसमसची लगबग सुरु झाली आहे. मुंबईमध्येही या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ख्रिसमसमुळे बाजारपेठा सजल्या आहेत. सालाबाद प्रमाणे यंदाही उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात येत आहे. नाताळाच्या पार्श्वभूमीवर हा सण अध्यात्म, भक्ती आणि श्रद्धेसोबतच आनंद, हर्ष, उल्हास आणि एकंदरीत जल्लोष घेऊन येतो. याच ख्रिश्चन धर्म आणि संस्कृतीत आढळणारे सांताक्लॉज हे काल्पनिक पात्र आहे.
या सांताक्लॉजचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे. हा सांताक्लॉज हा नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबर रोजी खेळणी आणि इतर भेटवस्तू वाटतो, असा त्यांच्या लोकांमध्ये समज आहे. हेच सांताक्लॉज पात्र लोकल ट्रेनच्या दारात उभा राहून प्रवास करताना दिसलं.
मुंबईची लोकल ट्रेन नोकरदारांसाठी जीवनवाहिनी आहे. या लोकल ट्रेनच्या गर्दीमुळे अनेकांना दारात उभं राहूनच प्रवास करावा लागतो. याच लोकलच्या गर्दीत सांताक्लॉजलाही लोकल ट्रेनच्या दारात उभं राहून प्रवास करावा लागला. यावेळी या सांताक्लॉजने मोठ्या आनंदात प्रवासांनाही हात केला. लोकांमध्ये आनंद, हर्ष, उल्हास निर्माण करणाऱ्या सणातील सांताक्लॉजने प्रवाशांशी संवाद साधला. हाच सांताक्लॉज ट्रेनने प्रवास करून कोणाला गिफ्ट देणार, हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
इन्स्टाग्रामवरील वसईकर अकाऊंट होल्डरने सांताक्लॉजचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला पन्नास हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर तीनशेहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. तर पन्नास हजारांहून अधिक लोकांना शेअर केला आहे. सांताक्लॉज लोकल ट्रेनने कुठे चाललाय? असा सवाल नेटकरी करत आहेत. 'सांता आम्हाला गिफ्ट देऊन नंतर जा, असंही काही नेटकरी म्हणत आहेत.
दरम्यान, ख्रिसमस सणामुळे सांताक्लॉजचे लहान-मोठे आणि देशी-परदेशी बनावटीचे रंगीबिरंगी बाहुले उपलब्ध झाले आहेत. तसेच ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, कागदी व प्लास्टिकच्या स्टार सोबतच लाकडी स्टार (चांदण्या), विविध स्वरूपातील चॉकलेट बॅगा, नाताळासाठी खास तयार केलेले म्युझिकल लाईट, टेबल क्लॉथ, ग्रिटींग कार्डस, डोअर-मॅट, वेलकम बॅनर, लाइटिंग-ट्री, स्नो इफेक्ट, ख्रिसमस ट्री, सिगिंग अँड डान्सिंग कॅप, रंगीबेरंगी इकोफ्रेंडली कँडल्सने बाजारपेठ सजली आहे. दरवर्षी ख्रिसमसच्या साहित्य खरेदीसाठी गजबजणाऱ्या बाजारपेठा पुन्हा एकदा सजलेल्या पाहायला मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.