सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रीचा उत्सव असून ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केलं जात आहे. दांडिया, गरबा तसेच रामलीलाचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करत आहेत. अशातच राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
रामाची भूमिका साकारणाऱ्या एका कलाकाराचा स्टेजवरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. शाहदरा भागात रामलीलाचा कार्यक्रम सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. सुनील कौशिक असे मृताचे नाव असून ते विश्वकर्मानगर परिसरातील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीचा उत्सव (Navratri Utsav 2024) सुरु असल्याने दिल्लीतील शाहदरा भागात शनिवारी रात्री रामलीला नाटकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुनील कौशिक हे भगवान रामाची भूमिका साकारत होते. स्टेजवर अभिनय करत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. काही क्षणातच सुनील स्टेजवर कोसळले.
रामलीला पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच सुनील यांचा मृत्यू झाला (Heart Attack) होता. अचानक घडलेल्या या दु:खद घटनेने मंचावर गोंधळ उडाला. त्याचवेळी रामलीला पाहण्यासाठी आलेले कलाकार आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली.
सुशील कौशिक हे प्रभू राम भक्त होते आणि गेल्या 20-25 वर्षांपासून दरवर्षी झिलमिल येथील विश्वकर्मा नगर येथील रामलीलेत रामाची भूमिका करत होते. शनिवारी रात्री त्यांना रामलीलाच्या मंचावर अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, रामलीलाच्या मंचावर मृत्यूपूर्वीच्या या दुःखद घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुनील कौशिक प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना दिसून येत आहेत. त्यावेळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. तीव्र कळा येत असल्याने सुनील यांनी हृदयावर हात ठेवला. काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.