चेहऱ्यावर तेज कायम राहावा, ग्लो यावा आणि पाऱ्यासारखा चमकावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी हवी ती आणि हवे तेवढे पैसे मोजून काही ट्रीटमेंट घेत असतात. मोठमोठ्या पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या थेरपी घेत असतात. ज्यांना हजारो, लाखो रुपये परवडत नाहीत, ते घरगुती उपाय करतात. एकदम साध्या अशा पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात. पण आता फायर फेशियल थेरपीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या फायर फेशियल थेरपीच्या व्हिडिओने सोशल मीडियावरील व्हायरल मार्केट एकदम जाम करून टाकला आहे. या व्हिडिओची पडताळणी केलेली नाही किंवा या थेरपीचे चांगले-वाईट परिणाम बहुतेकांना माहीत नाहीत. त्यामुळे या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण हा व्हिडिओ बघून नक्कीच घाबरून जाल.
फायर फेशियल थेरपीचा ( Fire Facial Therapy ) व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये महिलेच्या चेहऱ्यावर एक कापड ठेवण्यात आले आहे. ट्रिटमेंट करणारी महिला त्यावर आग लावताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली.
ही थेरपी मुळात चीन आणि व्हिएतनाम या देशाची आहे. ही थेरेपी करताना चेहऱ्यावर अल्कोहोल आणि एक स्पेशल सिरम लावलेला कपडा ठेवला जातो आणि काही सेकंदांसाठी आग लावली जाते. या ट्रिटमेंटमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुरळीत होते आणि त्वचेवर ग्लो येतो, त्वरित एक्सफोलिएशन होते, सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावरील डाग घालवण्यास मदत करते, असा दावा केला जातो.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा मूर्खपणा आहे, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर पैसे घेऊन जीव घेणार काय? असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या ट्रिटमेंटमध्ये आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रिटमेंट करायच्याच कशाला असे काहींचे म्हणणे आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.