Nanded : कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या; साम टीव्हीच्या बातमीनंतर फायनान्स कंपनीला टाळं

Nanded Farmers News : नांदेडमध्ये खालसा फायनान्सच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ. तिघांविरुद्ध अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल. माळकवठ्यातील कथित कर्जवसुली प्रकरणांचीही चौकशी करण्याची मागणी.

खासगी कर्जाच्या वसुलीसाठी होणाऱ्या कथित छळाचा गंभीर प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. खालसा फायनान्सच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी तिघांविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी दिली.तसेच फायनान्स कंपनीला टाळे ठोकण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातून व्याजाची रक्कम कापून त्यांना केवळ सात हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. कर्जाची परतफेड न केल्यामुळे त्यांना गावातून कार्यालयात आणून डांबून ठेवल्याचे सांगितले जात आहे. याच कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे खासगी कर्जवसुलीच्या पद्धतींवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील माळकवठा गावातही कर्जवसुलीच्या कथित प्रकारांमुळे भीतीचे वातावरण आहे. दहा हजार रुपयांच्या कर्जावर साप्ताहिक हप्ते आणि विलंब झाल्यास दररोज दंड आकारला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नागेश कोंकेवाड आणि दत्ता गायकवाड हे दोघे चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. तसेच, महेंद्र हनुमंते यांना कार्यालयात डांबून फोनपेद्वारे पैसे वसूल केल्यानंतर सोडल्याचा आरोप आहे. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com