पळपुटेपणा सोडा, संसदेत चर्चेला सामोरे जा; CM फडणवीसांचं राहुल गांधींसह विरोधकांना आव्हान, VIDEO

CM Devendra Fadnavis : पळपुटेपणा सोडा आणि संसदेत चर्चेला सामोरे जा, असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींसह विरोधी पक्षांना दिलं.

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. तर दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. दुसरीकडे, आंदोलन मागे घ्यावे, चर्चा सुरूच ठेवू, असा प्रस्ताव सरकारकडून दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सीजेपीने तो प्रस्ताव फेटाळल्याचेही समजते. पेपरफुटीत दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून खटला चालवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे आज, गुरुवारी सकाळी पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी थेट राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले, देवेंद्र फडणवीस....

राहुल गांधींसहीत सर्व विरोधी पक्षांना आव्हान आहे की पळपुटेपणा सोडा आणि संसदेत चर्चेला सामोरे जा. विद्यार्थ्यांचे खरे कैवारी असाल तर हिंमत दाखवा. लोकशाहीत निर्णय रस्त्यावर नाहीत, तर संसदेत होतात. जर देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा. उत्तरे हवी असतील तर संसदेत मागा. तुमच्याकडे कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारला भाग पाडा. आंदोलनाच्या भरवशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा. खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर चर्चेच्या माध्यमातून ते होतील. पंतप्रधान मोदींनी विद्यार्थी हिताला सर्वतोपरी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेपर लीकसंदर्भात फास्ट ट्रकवर प्रकरणे घेऊन गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येईल, असा निर्णय मोदींनी घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणात एक अत्यंत कडक भूमिका मोदींनी घेतली आहे. कुठलीही अडचण न येता नीट परीक्षा झाली आहे. अशाच पुढील परीक्षा झाल्या पाहिजेत या दृष्टीने ही चर्चा अत्यंत आवश्यक आहे. यूपीए सरकारच्या काळात ८ हजार कोटींचे बजेट होते. ते १ लाख ३९ हजार कोटींचे बजेट केले आहे. आयआयटी, एम्स, सगळ्या संस्थांची संख्या वाढवली. मेडिकल एज्युकेशन, इंजिनीअरिंग यासह सगळ्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विरोधी पक्षांमध्ये चर्चा करण्याची हिंमत नाही. कारण त्यांना उत्तर द्यावे लागले. कशा पद्धतीने कर्नाटकात पेपर लीक झाला, तेलंगणात पेपर लीक झाले. पंजाबमध्ये झाले होते. त्याचे उत्तर द्यावे लागेल. त्यांच्या प्रत्येक सरकारमध्ये झालेले घोटाळे बाहेर येतील आणि म्हणून त्यांना चर्चा करायची नाही. अराजकता हीच केवळ मानसिकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com