

एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत पाकिस्तान-A विरुद्ध भारत-A ला 48 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. 314 रन्सच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम 265 रन्सपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार तिलक वर्माने शतक झळकावूनही टीमला विजय मिळवून देता आला नाही. या पराभवामागे मधल्या फळीतील फलंदाजांची खराब कामगिरी, महत्त्वाच्या वेळी पडलेल्या विकेट्स आणि तिलकला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ न मिळणं ही प्रमुख कारणं ठरली.
रविवारी दोहाच्या वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. पाकिस्तान-A ने प्रथम फलंदाजी करताना 49.2 ओव्हर्समध्ये 313 रन्स केले होते. पाकिस्तानच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केल्यामुळे भारतासमोर 314 रन्सचं आव्हान उभं राहिलं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या पराभवाची कारणं काय आहेत ते पाहूयात.
भारताला अभिषेक शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने 42 चेंडूंत 70 रन्स केले होते. पण त्यानंतर टीम इंडियाची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. वैभव सूर्यवंशी 11, आयुष बदोनी 0, रिंकू सिंह 6 आणि सूर्यांश शेडगे 6 रन्स करून बाद झाले. एकामागून एक विकेट पडल्यामुळे भारतीय टीमवर दबाव वाढला. 129 रन्सपर्यंत भारताने सहा विकेट गमावल्या होत्या.
भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी तिलक वर्मा आणि शाहबाज अहमद यांनी घेतली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 112 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा निर्माण झाल्या. शाहबाजने 41 चेंडूंत 56 रन्स केले. पण धावांचा वेग वाढवण्याची गरज असतानाच त्याची विकेट पडली. ही विकेट भारतासाठी मोठा धक्का ठरली.
कर्णधार तिलक वर्माने एक बाजू लावून धरत 149 चेंडूंत 100 रन्स केले. परंतु दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. शाहबाज बाद झाल्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकता आलं नाही. त्यामुळे तिलकची शतकी खेळीही भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही.
पाकिस्तान-A च्या फलंदाजांनी तीन अर्धशतकांच्या जोरावर 313 रन्सचा डोंगर उभा केला होता. हे आव्हान गाठण्यासाठी भारतीय फलंदाजांना सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करण्याची गरज होती. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये स्विंगचा चांगला वापर केला. तसेच महत्त्वाच्या वेळी विकेट घेत भारताला दबावाखाली ठेवलं. अखेर भारतीय संघ 49.1 षटकांत 265 धावांवर सर्वबाद झाला आणि 48 धावांनी सामना गमावला.
सामन्यानंतर कर्णधार तिलक वर्माने टीमच्या फलंदाजीबाबत नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते, मधल्या फळीत सतत विकेट पडल्यामुळे टीमला मोठी पार्टनरशिप करता आली नाही. तिलक आणि शाहबाज रन्सचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असतानाच शाहबाजची विकेट पडली. तो आणखी दोन ओव्हर्स मैदानावर टिकला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता, असं तिलकला वाटतं. स्वतःच्या शतकापेक्षा टीमचा विजय महत्त्वाचा असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.