
आशिया कपच्या अंतिम सामन्यात तिलकने भारताला विजय मिळवून दिला.
आशिया कप २०२५ जिंकल्यानंतर तिलक वर्मा मायदेशी परतला.
हैदराबाद विमानतळावर चाहत्यांनी तिलक वर्माचे जंगी स्वागत केले.
Asia Cup 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले. सामन्यात नाबाद ६९ धावा करून भारताला नवव्यांदा आशिया कपची ट्रॉफी मिळवून देणाऱ्या तिलक वर्माचे हैदराबादमधील शमशाबाद विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. तिलकला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. तेलंगणा क्रीडा प्राधिकरणाचे अध्यक्ष शिवसेना रेड्डी आणि व्यवस्थापकीय संचालक सोनी बाला देवी यांनी तिलकचे स्वागत केले.
आशिया कप जिंकवून देणाऱ्या तिलक वर्माला पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केली होती. तिलक मायदेशी परतल्यावर वातावरण खूप आनंदी होते. तो विमानतळाबाहेर पडताच चाहते त्याच्याभोवती जमा झाले. कारच्या सनरूमधून हात हलवत त्याने चाहत्यांना अभिवादन केले. अंतिम सामन्यात केलेल्या शानदार कामगिरीमुळे चाहत्यांनी तिलकचे जंगी स्वागत केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिलकचे स्वागत करण्यासाठी त्याचे कुटुंब विमानतळावर पोहोचले होते. तिलकचा भाऊ तरुण वर्माने विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. तिलकच्या कामगिरीबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. तरुण वर्मा म्हणाला, 'तो खूप चांगला खेळला. अंतिम सामन्यात अशी कामगिरी करणे कठीण असते. पण त्याने ते केले. फलंदाजी करताना त्याच्यावर दबाव होता. पण तो दबावाच्या स्थितीत चांगला खेळ करु शकतो हे आम्हाला ठाऊक होते'
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने १४६ धावा केल्या होत्या. १४७ धावांचे आव्हान गाठत असताना भारताने अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल अशा ३ विकेट्स गमावल्या. त्यानंतर तिलक वर्माने संयमी खेळी केली. संजू सॅमसन, शिवम दुबे यांच्या साथीने तिलकने भारताला सामना जिंकवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.