Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Shubman Gill 2027 World Cup: शुभमन गिलने 2027 वर्ल्ड कपला अपूर्ण काम म्हटलं आहे. कर्णधारपदाचं दडपण, नंबर वन वनडे फलंदाज होण्याचा अनुभव आणि विराट कोहली-रोहित शर्माच्या अनुभवाबद्दलही गिलने महत्त्वाचं वक्तव्य केलं.
Shubman Gill
Shubman Gillsaam tv
Published On: 

भारताचा टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिल सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2027 वर लक्ष केंद्रित करतोय. पुढील वर्षी होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करण्यासाठी गिल उत्सुक आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सिरीजदरम्यान बोलताना गिलने कर्णधार म्हणून झालेली प्रगती, तसंच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुभवाबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

शुभमन गिल सध्या जगातील वनडे क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज आहे. याशिवाय तो भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधारही आहे. दोन फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना झालेल्या बदलाबद्दल गिलने आपलं मत मांडलं.

Shubman Gill
Asian Games: भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सुवर्णपदक

'कर्णधारपदाकडे जबाबदारी म्हणून पाहतो'

कर्णधार झाल्यानंतर आपल्यावर दबाव वाढला आहे असं गिलला वाटत नाही. तो कर्णधारपदाकडे एक मोठी जबाबदारी म्हणून पाहतो. गिल म्हणाला, "मी याकडे अधिक एक जबाबदारी म्हणून पाहतो. लहानपणी भारताचा कर्णधार होण्याचं माझं स्वप्न नव्हतं. माझं स्वप्न देशासाठी खेळणं आणि देशाला सामने जिंकून देणं हेच होतं. त्यामुळे जेव्हा मला कर्णधारपदाची संधी मिळाली, तेव्हा तो माझ्यासाठी मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी होती. मला संघाची जबाबदारी देण्यात आली आहे, असा विचार केल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात. मला याचा फार दबाव जाणवत नाही. कारण माझ्या मते, जर मी योग्य हेतूने काम केलं, तर बाकीच्या गोष्टी आपोआप योग्य पद्धतीने होतील."

'2027 वर्ल्ड कपचं काम अजून अपूर्ण'

2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाला. त्या पराभवाची आठवण अजूनही गिलच्या मनात आहे. त्यामुळे 2027 चा वर्ल्ड कप त्याच्यासाठी खास असल्याचं त्याने सांगितलं.

गिल म्हणाला, "हो, नक्कीच हे अपूर्ण काम आहे. त्या वर्ल्ड कपमध्ये आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्यामुळे आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम टीम असल्यासारखे दिसत होतो. पण वर्ल्ड कप असाच असतो. तुम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगलं खेळू शकता, पण एका सामन्यात तुमचा खेळ चांगला झाला नाही आणि तो सामना वर्ल्ड कपचा अंतिम सामना असेल, तर सगळं बदलू शकतं."

तो पुढे म्हणाला, "एक खेळाडू म्हणून देशाचं प्रतिनिधित्व करत वर्ल्ड कप खेळण्याची संधी तुम्हाला वारंवार मिळत नाही. तुमच्या कारकिर्दीत दोन, तीन, चार किंवा पाच वर्ल्ड कप मिळतील की नाही, हेही सांगता येत नाही. त्यामुळे देशासाठी खेळलेला प्रत्येक वर्ल्ड कप हा मोठा सन्मान असतो. आणखी एका वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळत आहे, यासाठी मी खूप आभारी आहे."

नंबर वन फलंदाज बनणं गिलसाठी खास

वनडे क्रमवारीत जगातील नंबर वन फलंदाज बनल्याचा अनुभवही गिलने सांगितला. 2023 च्या वर्ल्ड कपदरम्यान पहिल्यांदा तो वनडे क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला होता. गिल म्हणाला, "मी पहिल्यांदा नंबर वन फलंदाज झालो, ते 2023 च्या वर्ल्ड कपदरम्यान होतं. त्यावेळी खूप चांगलं वाटलं. लहानपणी तुम्ही क्रमवारी पाहता आणि एकदा तरी नंबर वन वनडे फलंदाज व्हायचं, असं मनात असतं. त्यामुळे ते एक ध्येय पूर्ण झाल्यासारखं होतं."

Shubman Gill
Eng vs Pak Highlights : इंग्लंडनं पाकिस्तानला दिला ८ वर्षांनंतर जबरा झटका; एक डाव आणि १०३ धावांनी उडवला धुव्वा

विराट-रोहितसोबत खेळण्याबाबत गिल म्हणतो...

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंची साथ संघात असल्याबद्दलही गिलने आनंद व्यक्त केला. या दोन्ही खेळाडूंचा अनुभव टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा असल्याचं त्याने सांगितलं. गिल म्हणाला, "मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. विराट कदाचित सर्वोत्तम वनडे फलंदाज आहेत आणि रोहित जगातील सर्वोत्तम वनडे ओपनर आहे. हे दोन्ही खेळाडू संघात असणं, त्यांचा अनुभव आणि त्यांनी एकत्र घालवलेले अनेक क्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आम्हाला ते संघात असणं खूप आवडतं. त्यांचा अनुभव आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे."

मैदानावर विराट-रोहितचा सल्ला घेतो का?

कर्णधार म्हणून मैदानावर निर्णय घेताना तो फक्त विराट कोहली आणि रोहित शर्माच नाही, तर इतर खेळाडूंचंही मत घेत असल्याचं गिलने सांगितलं. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याकडूनही तो सल्ला घेतो.

Shubman Gill
IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशी बाद झाल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूने नको ते केलं; भारताने घेतला बदला, चौकार-षटकारांचा पाऊस

तो पुढे म्हणाला, "अनेकदा असं होतं की ते काही सांगायला येतात, तेव्हा कदाचित मी त्या गोष्टीचा आधीच विचार केलेला असतो. पण जर मी त्याचा विचार केलेला नसेल, तर ते काय विचार करत आहेत, त्यांचं मत काय आहे, हे मी ऐकतो. प्रत्येकाचं मत ऐकायचं, परिस्थितीबद्दल प्रत्येकजण काय विचार करतोय हे पाहायचं आणि त्यानंतर त्या परिस्थितीत माझ्या मते काय योग्य ठरेल, याचा निर्णय घ्यायचा. मला वाटतं, यातूनच शिकायला मिळतं."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com