
Team India Squad Announcement : रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर आता टीम इंडियाचं नेतृत्व कुणाकडे सोपवणार असा प्रश्न अवघ्या क्रिकेट विश्वाला पडला होता. त्याचं उत्तर अखेर मिळालं आहे. युवा आणि तंत्रशुद्ध, सातत्य आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा शुभमन गिल आता संघाची धुरा सांभाळणार आहे.
पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीनं टीम इंडियाची घोषणा केली आहे. इंग्लंडमध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे. २० जूनपासून पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेसाठी संघ घोषित केला असून, नवा कर्णधारही मिळाला आहे. शुभमन गिल संघाचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे, रिषभ पंतकडं मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.
अजित आगरकरच्या नेतृत्वात निवड समितीने १८ सदस्यांचा संघ निवडला आहे. शुभमन गिल हा कर्णधार असेल. तर रिषभ पंत हा उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल. जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि रविंद्र जडेजा हे तिघे अनुभवी असले तरी, फिटनेस, सध्याचा फॉर्म, तंत्रशुद्ध समिती, फलंदाजीतील सातत्य आणि संयमी नेतृत्व कौशल्य अशी जमेची बाजू असल्यानेच निवड समितीनं त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया
शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), केएल राहुल, रविंद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करूण नायर, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
आगरकर काय म्हणाला?
गेल्या वर्षभरात आम्ही प्रत्येक पर्यायावर विचार केला. त्या-त्या वेळी शुभमन गिलकडं पाहिलं गेलं. ड्रेसिंग रुममधून बऱ्याच वेळा मते घेण्यात आली. तो युवा आहे. त्याच्यात सुधारणा दिसत आहेत. तोच योग्य खेळाडू आहे अशी आम्हाला आशा आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे. आमच्या त्याला शुभेच्छा आहेत, असं अजित आगरकर पत्रकार परिषदेत म्हणाला.
एखाद-दुसऱ्या दौऱ्यासाठी तुम्ही कर्णधाराची निवड करत नाहीत. आम्ही एक-दोन वर्षात त्याच्या कामगिरीतील सुधारणा बघितली आहे, असंही आगरकर म्हणाला. शुभमन गिल सलामीला खेळायला येणार की नाही याबाबतही आगरकरनं स्पष्टपणे सांगितलं. गौतम गंभीर आणि शुभमन हे सलामीला कोण खेळायला येईल, याबाबतचा निर्णय घेऊ शकतील. प्रत्यक्ष दौऱ्यावर गेल्यानंतरच ते याबाबत नक्की विचार करतील, असं आगरकर म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.