

भारतीय महिला क्रिकेटर श्रेयंका पाटील सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीये. सोशल मीडियावर श्रेयंका हिचा एक डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘बबली बदमाश है’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. मैदानावर आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत आणणाऱ्या श्रेयंकाचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडतोय.
श्रेयंका हिने स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलाय. व्हिडीओमध्ये ती अगदी कॉन्फिडन्सने डान्स करताना दिसतेय. तिचे एक्सप्रेशन्स आणि डान्सच्या स्टेप्सनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रेयंका सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते. ती वेळोवेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. हा व्हिडीओ शेअर करताना श्रेयंकाने ‘Just being a badmash’ असं कॅप्शन दिलंय. तिच्या या मजेदार अंदाजाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतेय.
श्रेयंका ज्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय, ते ‘बबली बदमाश है’ हे गाणं 2013 मध्ये रिलीज झालेल्या ‘शूटआउट एट वडाला’ या सिनेमातील आहे. हे गाणं सुनिधी चौहान यांनी गायलं असून अनु मलिक यांनी त्याला संगीत दिलं आहे.
व्हिडीओमध्ये श्रेयंकाचा अंदाज क्रिकेटच्या मैदानापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतोय. सोशल मीडियावर तिचा मस्ती करणारा आणि मजेशीर अंदाज अनेकदा पाहायला मिळतो. याच कारणामुळे तिच्या या डान्स व्हिडीओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
श्रेयंका पाटील ही भारतीय महिला क्रिकेटमधील युवा आणि महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. ती उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करते. याशिवाय गरज पडल्यास खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमताही तिच्याकडे आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रेयंका कर्नाटक टीमचं प्रतिनिधित्व करते. तिने भारताकडून टी-20 इंटरनॅशनल आणि वनडे क्रिकेटमध्येही खेळ केला आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर तिने कमी कालावधीत भारतीय टीममध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. विशेषतः ऑफ स्पिन आणि महत्त्वाच्या वेळी विकेट मिळवून देण्याच्या क्षमतेसाठी ती ओळखली जाते.
महिला प्रीमियर लीगमध्ये श्रेयंका पाटील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB टीमचा भाग आहे. RCBकडून खेळतानाही तिने तिच्या गोलंदाजीने चांगली छाप पाडलीये. WPLमध्ये ती टीममधील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक मानली जाते. क्रिकेटच्या मैदानावर विकेट घेण्याच्या क्षमतेमुळे चर्चेत असणाऱ्या श्रेयंकाचा हा डान्स व्हिडीओ तिची एक वेगळी बाजू चाहत्यांसमोर घेऊन आलाय. मात्र यावरून काहींनी तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केलाय.
श्रेयंकाच्या डान्स व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. काही जणांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर श्रेयंकानेही या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलंय. “लोक माझ्या डान्सच्या व्हिडीओला एवढं मोठं प्रकरण का बनवत आहेत, हेच मला समजत नाही. डान्स हा माझा नेहमीपासूनच आवडता छंद आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून डान्सचे व्हिडीओ शेअर करतेय. मी क्रिकेटर आहे पण याचा अर्थ असा नाही की मला डान्सचा आनंद घेता येणार नाही.
जर केवळ डान्स केल्यामुळे कोणी मला ट्रोल करत असेल, तर मला वाटतं की त्यातून माझ्याबद्दल कमी आणि त्या व्यक्तीच्या विचारसरणीबद्दल जास्त दिसून येतं,” असं श्रेयंकाने म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.