

बुधवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून भव्य पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. याद्वारे मुंबईतील दिग्गज खेळाडू आणि नवीन खेळाडूंना सन्मानित केलं गेलं. गेल्या दोन सिझनमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या कार्यक्रमात गौरवण्यात आलं.
या सोहळ्यात वरिष्ठ स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सिद्धेश लाड आणि शार्दुल ठाकूर यांना ‘जस्टिस तेंडुलकर ट्रॉफी’ देऊन सर्वोत्तम वरिष्ठ क्रिकेटपटू म्हणून सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीची ही दखल मानली जाते.
मुंबईच्या क्रिकेटचा देशभरातला दबदबा पुन्हा एकदा दिसून आला. अंडर-19 पुरुष वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा कॅप्टन आयुष म्हात्रे याचाही यावेळी खास सत्कार करण्यात आला. त्याचसोबत भारताच्या वर्ल्ड कपच्या विजयात मोलाचं योगदान देणाऱ्या मुंबईकर खेळाडू आणि कोचेसनाही सन्मानित करण्यात आलं.
यामध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अंडर-19 महिला वर्ल्ड कपमधली सानिका चालके, अंडर-19 पुरुष टीममधील अभिज्ञान कुंडू, महिला वर्ल्ड कप विजेत्या टीममधली जेमिमा रॉड्रिग्स, अमोल मुझुमदार आणि आविष्कार साळवी यांचा समावेश होता.
2024–25 सिझनमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या टीम्सनी जबरदस्त कामगिरी केली. या टीम्सचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, सीनियर महिला टी-20 ट्रॉफी, अंडर-14 वेस्ट झोन, अंडर-23 महिला वनडे, विजय मर्चंट ट्रॉफी (अंडर-16) आणि महिला अंडर-15 वनडे ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम्सचा गौरव MCAकडून करण्यात आला.
भविष्यातील टॅलेंटला सपोर्ट करण्यासाठी MCAकडून दिली जाणारी शरद पवार स्कॉलरशीपही या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. 2024–25 साठी नामन पुष्पक, नीरज धुमाळ, शौर्य राय, सन्मया उपाध्याय, इरा जाधव आणि ययाती गावड यांना ही स्कॉलरशीप मिळाली. तर 2025–26 साठी श्रेयस खिलारे, राजवीर लाड, वेदांत गोरे, वंश चंबळे, सिद्धी कामटे, रितिका यादव, उन्नती पाटील आणि मुद्रा खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
क्रिकेटमध्ये आयुष्यभर मोठं योगदान देणाऱ्या दिग्गजांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. 2025–26 साठी शोभा पंडित आणि श्रीकांत तिगडी यांना लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. तर 2024–25 साठी चंद्रकांत पाटणकर आणि रवींद्र सावंत यांना हा सन्मान मिळाला.
या सोहळ्याला भारतीय क्रिकेटमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राजीव कुलकर्णी आणि डायना एडुलजी यांच्यासह कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आणि अदिती तटकरे तसंच MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. MCAचं पदाधिकारी, एपेक्स काऊंसिल सदस्य आणि अनेक खेळाडूंनी उपस्थिती लावली होती.
MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितलं की, “मुंबई क्रिकेटने नेहमीच उच्च दर्जा कायम ठेवला आहे. ही परंपरा पुढे नेणं आपली जबाबदारी आहे. आज सन्मानित झालेले खेळाडू आणि टीम्स पुढच्या पिढीसाठी नवे बेंचमार्क सेट करतायत. आम्ही पुढच्या पिढीला अजून सक्षम बनवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहोत.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.