

उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे माजी खासदार आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणाचा निकाल जाहीर होताना ब्रिजभूषण शरण सिंह स्वतः न्यायालयात उपस्थित होते.
निकालापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, "मी फक्त न्यायालयाचा निर्णय ऐकण्यासाठी आलो आहे. या प्रकरणात माझ्या हातात काहीच नाही," असं सांगितलं होतं.
या प्रकरणात बृजभूषण शरण सिंह यांच्यासोबत विनोद तोमर यांनाही न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे.
हे प्रकरण सहा महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांशी संबंधित आहे. या महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
या आरोपांमुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती. अनेक ठिकाणी महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं आणि या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी न्यायालयाने निकाल देत ब्रिजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात 15 जून 2023 रोजी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. त्यामध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354 (महिलेचा विनयभंग), 354A (लैंगिक छळ किंवा अश्लील स्वरूपाची टिप्पणी), 354D (पाठलाग करणं) आणि 506(1) (गुन्हेगारी धमकी) या कलमांखाली आरोप लावण्यात आले होते.
त्यानंतर 10 मे 2024 रोजी ट्रायल कोर्टाने पाच महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या आरोपांप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात औपचारिक आरोप निश्चित केले. त्यावेळी न्यायालयाने उपलब्ध पुरावे पाहता IPC कलम 354 आणि 354A अंतर्गत खटला चालवण्यासाठी पुरेसा आधार असल्याचं म्हटलं होतं.
याशिवाय, दोन महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारींमध्ये IPC कलम 506(1) अंतर्गत गुन्हेगारी धमकी दिल्याचा आरोपही चालवण्यासाठी पुरेसे कारण असल्याचं न्यायालयाने नमूद केलं होतं. या प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्यावरही एका महिला तक्रारदाराला धमकावल्याचा आरोप होता. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हेगारी धमकी दिल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले होते.
याच प्रकरणात एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूनेही ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप केले होते. मात्र, नंतर तिने आपली तक्रार मागे घेतली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी POCSO (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण) कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला. न्यायालयाने तो स्वीकारल्यानंतर ते प्रकरण बंद करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.