
मुंबई : आयपीएल २०२५मध्ये उद्या रविवारी २० एप्रिलला डबल हेडर अर्थात २ सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. मात्र, साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्याकडे लागून आहे. या सामन्यात आयपीएलमधील २ यशस्वी संघात महामुकाबला होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा युवा आयुष म्हात्रे पलटणविरुद्ध आयपीएल पदार्पण करु शकतो.
वसईतील १७ वर्षीय युवा आयुष म्हात्रे याला चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या जागी संधी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. ऋतुराजला दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे चेन्नईने आयुषसाठी ३० लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर आता आयुष आपल्या घरच्याच मैदानात चेन्नईकडून आयपीएल पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे.
आयपीएलच्या एक्स (ट्वीटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या १९ सेकंदांच्या व्हिडिओत आयुष वानखेडे स्टेडियममध्ये सीएसके हेड कोच स्टीफन फ्लेमिंग आणि बॅटिंग कोच मायकल हसी यांच्या मार्गदर्शनात बॅटिंग करताना दिसतोय. त्यामुळे आयुषचं मुंबई विरुद्ध पदार्पण जवळपास निश्चित असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. मात्र, आयुषला संधी मिळणार की नाही? हे उद्याच स्पष्ट होईल.
आयुषची कारकिर्द
आयुषने ऑक्टोबरमध्ये फर्स्ट क्लास डेब्यू केला. आयुषने तेव्हापासून ९ फर्स्ट क्लास मॅचमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयुषने या ९ सामन्यांमधील १६ डावांमध्ये २ शतक आणि १ अर्धशतकासह ५०४ धावा केल्या आहेत. तसेच आयुषने ७ लिस्ट ए मॅचेसमध्ये २ सेंच्युरीसह ४५८ धावा केल्या आहेत. तसेच आयुष बॉलिंगही करतो. आयुषने लिस्ट ए क्रिकेटमधील ४ डावांमध्ये ११.२८च्या सरासरीने ७ विकेट्स घेतल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.