वयाच्या साठीनंतरही आयर्नमॅनच्या स्पर्धांमध्ये भारतीय तिरंगा फडकावणारे दशरथ जाधव हे एकमेव भारतीय ठरले आहेत. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी युनायटेड स्टेट्समधील कोणा (अमेरिका) येथे झालेल्या आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप ही १७ तासांची स्पर्धा त्यांनी १६:००:२९ तासात पूर्ण केली आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या यशामागे केवळ कठोर परिश्रमच नाही तर एक विलक्षण जिद्द, आत्मविश्वास, आणि कठोर शिस्त आहे.
दशरथ जाधव विशेषता म्हणजे त्यांचे मनोबल आणि आत्मशिस्त. शारीरिक ताकद जितकी महत्त्वाची, त्याहून अधिक महत्त्वाचे मानसिक धैर्य आहे. ते म्हणतात, "कुणाचे वय किती आहे, यावर कधीच अनुमान लावू नका, ध्येय गाठण्याची इच्छा असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते." त्यांच्या या विचारसरणीनेच त्यांना आयर्नमॅन स्पर्धेत जिंकण्याचे बळ दिले आहे.
आयर्नमॅन स्पर्धेत यश मिळवण्यासाठी स्पर्धकांना त्यांच्या वयोगटातील उच्चांकी वेळ नोंदवून क्वालिफाय व्हावे लागते. फुल्ल आयर्नमॅनमध्ये 4 किमी स्विमिंग, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी रनिंग अशी खडतर आव्हाने पूर्ण करावी लागतात.
कोणा हा अमेरिकेतील एक विशेष ज्वालामुखीय प्रांत आहे, जिथे अतिशय दमट वातावरण आणि प्रखर उष्णता, त्यामुळे खेळाडूंसमोर असामान्य आव्हानं आ वासून उभी असतात. इथे, शरीरातील पाणी वेगाने कमी होत असल्यामुळे, पायात क्रॅम्प्स येतात आणि अशक्तपणा सहज जाणवतो.
याशिवाय, उलट वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे सायकल चालवताना होणारी दमछाक वाट्याला येते. ह्या सगळ्या अडथळ्यांना ठामपणे पार करत दशरथ जाधव यांनी ही चॅम्पियनशिप स्पर्धा जिद्दीने पूर्ण केली. कोणा (अमेरिका) येथे अशा परीक्षेला सामोरे जाणे म्हणजे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक क्षमतेचीही कसोटी लागते.
याआधीही दशरथ जाधव यांनी आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या हाल्फ आयर्नमॅन स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सेंट जॉर्ज २०२२ आणि लहाती फिनलंड २०२३ येथे त्यांनी यश मिळवले होते. २०२३ मध्ये त्यांनी ULTRAMAN Florida USA स्पर्धेत 10 किमी स्विमिंग, 423 किमी सायकलिंग, आणि 84 किमी रनिंग पूर्ण करत 34 तास 51 मिनिटांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
तसेच, त्यांनी 14 फुल्ल आयर्नमॅन, 6 हाफ आयर्नमॅन, अनेक हाफ आणि फुल मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. 1542 किमीची लंडन-एडिनबर्ग-लंडन सायकल स्पर्धा आणि 650 किमीची पुणे-गोवा डेक्कन क्लिफहंगर सायकल स्पर्धा यातही त्यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे.
दशरथ जाधव यांचा आत्मविश्वास हा त्यांच्या यशाचा कणा आहे. कधीच हार न मानता सतत पुढे जाण्याची त्यांची वृत्ती तरुणांसाठी प्रेरणादायक ठरते. त्यांनी स्वतःला वयाच्या मर्यादांत अडकवून घेतलेले नाही, उलटपक्षी त्यांनी वयाला एक संधी म्हणून पाहिले आहे.
त्यांच्या दैनंदिन जीवनातील शिस्त हे देखील त्यांच्या यशाचे रहस्य आहे. रोजच्या वेळेचे पालन करत, नियमित व्यायाम आणि निरोगी आहार पाळणारे श्री.दशरथ जाधव म्हणजे आत्मशिस्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.
डोर्लेवाडी बारामती येथे २६ डिसेंबर १९५७ रोजी जन्मलेल्या श्री. दशरथ जाधव यांचे शालेय शिक्षण एसएससी आणि आयटीआय डिप्लोमा आहे.
श्री. दशरथ जाधव साहेबांच्या कठोर परिश्रम आणि आत्मशिस्तीमुळे त्यांचे यश आज अभिमानास्पद ठरले आहे. वयाच्या सीमा ओलांडून मिळवलेले त्यांचे यश संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.