भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघनांध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केल्याने षटकं कमी करण्यात आली होती. भारतीय संघाने १९.३ षटकात ७ गडी बाद १८० धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १५ षटकात १५२ धावा करायच्या होत्या. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने ७ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केलं. दरम्यान या पराभवानंतर काय म्हणाला भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव? जाणून घ्या.
या पराभवानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, ' मला असं वाटतं की, आम्ही मॅचविनिंग स्कोअर केला होता. मात्र त्यांनी ५-६ षटकं अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे हा सामना आमच्या हातून निसटला. या मैदानावर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं जरा कठीण होतं. कारण चेंडू ओला झाला होता. आम्हाला यापुढेही अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल. हा आमच्यासाठी एक धडा आहे. आम्ही तिसऱ्या टी -२० सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.' (Suryakumar Yadav Statement)
तसेच गेम प्लानबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की,' आम्ही अशा प्रकारच्या क्रिकेट ब्रँडबदल बोलत असतो. सर्वांसाठी एकच मेसेज आहे, की जा आणि स्वतः ला व्यक्त करा. आमच्या ड्रेसिंगरूमचं वातावरण नेहमी हसतं खेळतं असतं. सर्व उत्साहात असतात. मी खेळाडूंना सांगून ठेवलंय ते तिथेच विसरून जा.' (Latest sports updates)
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर,भारतीय संघाने सुरुवातीच्या ६ षटकात दोन्ही सलामीवीर फलंदाजांना गमावलं होतं. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ५६ आणि रिंकू सिंगने नाबाद ६८ धावांची खेळी करत भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाठलाग करताना महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत १-० ची आघडी घेतली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.