India vs Bangladesh 1st T20I, Team India Playing XI: कसोटी मालिकेत बांगलादेशला धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी मैदानात उतरला आहे. ग्वालियरच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना सुरु आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृ्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात २ युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.
बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकला आणि ग्वालियरच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यासाठी आयपीएल गाजवणाऱ्या नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज मयांक यादवला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. हे दोघेही भारतीय टी-२० संघासाठी पदार्पण करणारे ११६ आणि ११७ क्रमांकाचे खेळाडू ठरले आहेत. नितीश कुमारने हैदराबादकडून खेळताना फलंदाजीत आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी करुन दाखवली होती. तर मयांक यादवने ताशी १५० किमीच्या गतीने गोलंदाजी करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
मयांक यादव आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १४ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १९ गडी बाद केले आहेत. तर नितीशच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २० सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत ३९५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं झळकावली आहेत.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती,हार्दिक पांड्या, रियान पराग, अर्शदीप सिंग, मयंक यादव
बांगलादेश: लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसैन इमॉन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.