

एफआयएच हॉकी पुरुष वर्ल्डकप 2026 मध्ये भारतीय टीमसमोर आज पाकिस्तानचं आव्हान आहे. बुधवारी एम्सटेलवीनच्या वेगनेर स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पूल डीमधील अखेरचा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताला दुसऱ्या फेरीत पोहोचण्यासाठी विजय मिळवणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागलेला नाही. त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण हॉकीविश्वाचं लक्ष लागलं आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटं विकली गेल्याची माहिती आहे. वेगनेर स्टेडियमची प्रेक्षक क्षमता सुमारे 10 हजार असून स्टेडियम हाऊसफुल्ल होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. भारतातील चाहते जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स सेलेक्ट 2 या माध्यमांवर सामन्याचा थरार पाहू शकतील.
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय टीमला डिफेन्समध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारताचा माजी कर्णधार आणि गोलरक्षक पीआर श्रीजेश यानेही भारताच्या बचावातील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे.
जिओस्टारशी बोलताना श्रीजेशने सांगितलं की, टीम इंडिया गेल्या दीड वर्षापासून नव्या फॉर्मेशनमध्ये खेळतेय. या फॉर्मेशनमुळे अनेकदा टीमला डिफेन्सवर अधिक भर द्यावा लागतो. प्रो लीगमध्ये भारताने अनेक सामन्यांमध्ये आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर सुरुवातीपासून दबाव टाकला होता. युरोपियन टीम्सविरुद्ध खेळताना बचावात एकत्र राहणं महत्त्वाचं आहे. वर्ल्डकपमध्ये भारताने आपला नैसर्गिक खेळ करायला हवा.
डिफेन्स करताना भारतीय टीमने झोनल मार्किंगचा वापर केलाय. त्यामुळे खेळाडूंमध्ये या पद्धतीबाबत आणखी चांगला समन्वय होण्याची गरज आहे. सेंटर लाईनच्या पुढे जाऊनही दबाव निर्माण करण्याची गरज आहे. पूर्वी ३५ मिनिटांच्या दोन हाफमध्ये सामने होत असताना फिटनेसची कमतरता किंवा चुकीच्या निर्णयांमुळे आम्ही चुका करायचो. मात्र, चार क्वार्टरची पद्धत लागू झाल्यानंतर आणि त्याआधीपासूनही आमच्या फिटनेस, ताकद, खेळाची समज आणि निर्णयक्षमता यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानविरुद्धचे सामने पूर्वीसारखे कठीण राहिलेले नाहीत, असंही श्रीजेशने सांगितलंय.
पॉईंट्स टेबलचा विचार केला तर पूल ‘डी’मध्ये इंग्लंडने दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या खात्यात एका विजयासह तीन पॉईंट्स आहेत. पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध १-४ असा पराभव पत्करावा लागला, तर वेल्सविरुद्धचा सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात एक पॉईंट्स असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. वेल्सनेही एक सामना गमावला असून एका सामन्यात बरोबरी साधल्याने त्यांच्या खात्यात एक गुण आहे आणि ते चौथ्या स्थानावर आहेत.
पाकिस्तानचा पराभव झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. दुसरीकडे पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी वेल्सला इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. भारताने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर या पूलमधील एकही पॉईंट त्यांना पुढे नेता येणार नाही. मात्र भारताला पराभूत केल्यामुळे इंग्लंडला तीन पॉईंट्ससह पुढील फेरीत जाता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.