

भारतीय टी-20 टीमची जबाबदारी स्वीकारल्यानंतर श्रेयस अय्यरने गेल्या काही महिन्यांत कर्णधार म्हणून आपली भूमिका चांगली सांभाळलीये. पुढील दोन वर्षांनी होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय टीमची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 सिरीजपूर्वी जिओस्टारच्या ‘फॉलो द ब्लूज : सरपंच श्रेयस’ या शोमध्ये अय्यरने टीमचा दृष्टिकोन, फलंदाजीची पद्धत आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसोबतच्या संवादाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
श्रेयस अय्यरच्या मते, भारतीय खेळाडूंनी मैदानावर मोकळेपणाने आणि कोणतीही भीती न ठेवता खेळायला हवं. बाहेरून असलेल्या अपेक्षांचा जास्त विचार न करता आपल्या नैसर्गिक खेळावर विश्वास ठेवण्याची गरज आहे.
अय्यर म्हणाला की, खेळाडूंनी आपली खासियत दाबून ठेवू नये. कारण असं केल्यास त्यांचा खरा खेळ मैदानावर दिसणार नाही. टीमतील खेळाडूंनी एकमेकांना प्रत्येक परिस्थितीत साथ देणं महत्त्वाचं आहे. कठीण वेळ आली तरी प्रत्येक खेळाडू आपल्या सहकाऱ्याच्या पाठीशी उभा राहील, असा टीममध्ये विश्वास असायला हवा.
फलंदाजीबद्दल बोलताना अय्यरने सांगितलं की, सामन्याची परिस्थिती पाहून मी फलंदाजी करतो. पॉवरप्लेमध्ये फलंदाजीला आल्यास फिल्डींगच्या नियमांचा फायदा घेण्याचा माझा प्रयत्न असतो. हीच पद्धत मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळायला सुरुवात केल्यापासून ठेवली आहे. फलंदाजीला आल्यानंतर स्वतःसाठी चांगली सुरुवात करण्यासोबतच त्याच्यानंतर येणाऱ्या फलंदाजांसाठीही चांगला पाया तयार करण्याचा प्रयत्न करतो.
वैभव सूर्यवंशीचं श्रेयस अय्यरने विशेष कौतुक केलंय. वैभवशी तो क्रिकेटशिवाय इतर विषयांवरही बोलतो. कारण प्रत्येकजण वैभवशी क्रिकेटबद्दलच चर्चा करत असतो. वैभवचं कुटुंब, त्याची आवड आणि मैदानाबाहेर तो काय करतो, याबद्दल चर्चा केल्यावर तो अधिक मोकळेपणाने बोलतो, असं अय्यरने सांगितलं. त्याच्या मते, वैभव खूप शांत स्वभावाचा आहे. मात्र मैदानावर उतरल्यावर तो अतिशय आक्रमक आणि धडाकेबाज खेळ करतो. तो खूप साधा आणि गोड मुलगा असल्याचंही अय्यरने सांगितलंय.
वैभव सूर्यवंशीची योग्य वेळ नक्कीच येईल. सध्या भारतीय टीममध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या ओपनर्सना खेळण्याची संधी मिळतेय. मात्र जेव्हा वैभवची वेळ येईल, तेव्हा तो भारतीय क्रिकेटवर आपली छाप पाडेल, असा विश्वास अय्यरने व्यक्त केला.
टीममध्ये करण्यापेक्षा सिरीज जिंकणं आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं असल्याचं अय्यरने स्पष्ट केलं. सुरुवातीपासूनच वेगवेगळे प्रयोग करणं योग्य नाही, असं त्याचं मत आहे.
सतत टीममध्ये बदल होत राहिल्यास खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. त्यांना पुढच्या सामन्यात संधी मिळेल की नाही, असा प्रश्न पडू शकतो. त्यामुळे खेळाडू स्वतःवर आणि आजूबाजूच्या सहकाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित करू लागतात. अशी मानसिकता टीमसाठी योग्य नसल्याचं अय्यरने सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.