
ऑनलाईन गेमिंग बिल पास झाल्यानंतर ड्रीम ११ ने भारतीय क्रिकेट संघाची स्पॉन्सरशिप थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे आशिया कपपूर्वी बीसीसीआयला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.
२०२३ मध्ये बीसीसीआय-ड्रीम ११ यांच्यामध्ये ३ वर्षांसाठी ३५८ कोटींचा करार झाला होता.
Dream11 BCCI Sponsorship : गुरुवारी (२१ ऑगस्ट) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 'द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल' मंजूर करण्यात आले. याचा सर्वात मोठा फटका फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम ११ ला बसला आहे. ऑनलाइन गेमिंग बिल पास झाल्यानंतर ड्रीम ११ ने भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व म्हणजे स्पॉन्सरशिप करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ड्रीम ११ कंपनीने बीसीसीआयला अधिकृत पत्रक पाठवले आहे. या निर्णयामुळे आशिया कप सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, ड्रीम ११ कंपनीच्या प्रतिनिंधीनी मुंबईतील बीसीसीआय कार्यालयाला भेट दिली आणि बोर्डाच्या सीईओंना त्यांच्या निर्णयाची माहिती दिली. यापुढे स्पॉन्सरशिप सुरु ठेवणार नसल्याचे ड्रीम ११ च्या प्रतिनिधींनी बीसीसीआय कार्यालयाला भेट देऊन सीईओ हेमांग अमीन यांना कळवले. परिणामी लवकरत स्पॉन्सरसाठी बीसीसीआय नवीन निविदा जारी करेल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
ड्रीम ११ ने स्पॉन्सरशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. पण याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयच्या एका कलमानुसार, जर भारत सरकारने लागू केलेल्या कायद्यामधील बदलांमुळे स्पॉन्सर कंपनीच्या मुख्य व्यवसायावर परिणाम झाला तर स्पॉन्सर कंपनी बीसीसीआयला पैसे देण्यास जबाबदार राहणार नाही.
१८ वर्षांपूर्वी ड्रीम ११ ची स्थापना झाली होती. ८ अब्ज डॉलर्स मूल्य असलेली ही कंपनी ११ जुलै २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाची स्पॉन्सर बनली होती. बीसीसीआय आणि ड्रीम ११ यांच्यात ३५८ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा करार झाला होता. भारतीय संघाव्यतिरिक्त महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांसारख्या आघाडीच्या खेळाडूंना कंपनीने ब्रँड अँबेसेडर म्हणून सामील केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.