

India women Asia Cup 2026 trophy controversy : आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच तोंडावर आपटणारा पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानातही तोंडघशी पडला आहे. भारतीय महिला संघानं पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. आशिया कपचे जेतेपद पटकावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून भारतीय संघानं ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. या नाट्यानंतर नक्वी मैदानातून लगबगीनं निघून जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारतीय महिला संघानं तब्बल आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. आशिया चषक २०२६ च्या फायनलमध्ये भारतीय संघानं श्रीलंकेचा दारूण पराभव केला. सामना सुरू असताना मैदानात घडणाऱ्या घडामोडींमुळं क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती, त्याप्रमाणेच सामना संपल्यानंतर मैदानात नाट्य बघायला मिळालं. भारतीय महिला संघातील खेळाडूंनी पीसीबी अध्यक्ष नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय पुरुष संघानेही गेल्या वर्षी आशिया कप फायनलनंतर ट्रॉफी स्वीकारली नव्हती.
मोहसिन नक्वी हे एशियन क्रिकेट कौन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. ते एसीसीचे अध्यक्ष असल्यानं आशिया कपच्या फायनलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या श्रीलंका संघाची कर्णधार चमारी अटापटूला नक्वी यांनी रनर्स अपचा धनादेश सुपूर्द केला. पण भारतीय महिला संघाने विजेतेपदाची ट्रॉफी त्यांच्या हातून घेण्यास नकार दिला.
नक्वी यांच्या हातून विजेतेपदाची ट्रॉफी दिली जाणार होती. पण जेव्हा ट्रॉफी देण्याची वेळ आली तेव्हा बराच वेळ झाला तरी भारतीय संघाकडून कोणताही खेळाडू ती घेण्यास पुढे आला नाही. नक्वी हे पोडियमवर ट्रॉफी देण्यासाठी बराच वेळ थांबून राहिले. पण भारतीय संघ ट्रॉफी घेण्यासाठी आलाच नाही.
याआधीही २०२५ च्या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यावेळी नक्वी ट्रॉफी घेऊन स्वतःसोबत निघून गेले होते. आता महिला संघानंही त्यांच्या हातून ट्रॉफी आणि मेडल स्वीकारण्यास नकार दिला आहे.
फायनलनंतर जे घडलं ती साधारण बाब आहे. त्यात काही विशेष नाही. आम्ही देश आणि आमच्या देशवासियांचा सन्मान लक्षात घेऊन ही गोष्ट केली. पाकिस्तानसोबत खेळू नये असं बहुतांश भारतीयांना वाटतं. तरीही आम्ही खेळतोय. सध्याच्या घडीला तरी त्यांच्याकडून ट्रॉफी घेणार नाही. ते आम्हाला मान्यच नाही.
देवजीत सैकिया, सचिव, बीसीसीआय
तत्पूर्वी, भारताने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना शेफाली वर्मा (६९) आणि स्मृती मानधना (५९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १८३ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ १११ धावांत गारद झाला. टीम इंडियाने ७२ धावांनी सामना जिंकला. आशिया चषकावर आठव्यांदा कब्जा मिळवला. गोलंदाजीत भारताकडून दीप्ती शर्मा आणि श्री चरणीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.