
आशिया कपमध्ये भारत विरुद्ध ओमान सामन्यात भारताचा विजय झाला.
शेवटच्या ओव्हर्समध्ये सामना ओमानच्या बाजूने झुकला होता.
हार्दिक पंड्यामुळे टीम इंडियाने ओमानच्या संघावर विजय मिळवला.
Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध ओमान हा सामना काल (१९ सप्टेंबर) यूएईतील शेख झायेद स्टेडियममध्ये खेळला गेला. हा सामना अपेक्षेपेक्षा जास्त रोमांचक ठरला. ओमानसारख्या छोट्या संघाने भारतीय संघाला टक्कर दिली. पण शेवटी हार्दिक पंड्याने घेतलेल्या चमत्कारिक कॅचने भारताचा विजय पक्का झाला. हाच क्षण भारतासाठी टर्निंग पॉइंट ठरला. विजयाची हॅटट्रीक करत भारताने आशिया कप २०२५ च्या सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.
सूर्यकुमार यादवने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अभिषेक शर्माने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी करत १५ चेंडूत ३८ धावा केल्या. शुबमन गिल लवकर बाद झाला. पण संजू सॅमसनने आक्रमक खेळी करत डाव सावरला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारत ५६ धावा केल्या. हर्षित राणाने २९ धावा आणि अक्षर पटेलने २६ धावा असे योगदान दिले. २० ओव्हर्समध्ये ८ गडी गमावरुन भारताने १८८ धावा केल्या. ओमानकडून शाह फैसल, जितेन रामानंदी आणि आमिर कलीम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
१८९ धावांचे लक्ष्य गाठताना ओमानच्या फलंदाजांना उत्कृष्ट खेळ दाखवत सर्वांना आश्चर्यचकीत केले. कर्णधार जतिंदर सिंह आणि आमिर कलीम यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. ओमानसाठी कलीमने एकट्याने सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. ४६ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार मारुन त्याने ६४ धावा केल्या. त्याला हम्माद मिर्झाची साथ मिळाली, मिर्झाने ५१ धावा केल्या. हार्दिक, अर्शदीप, कुलदीप आणि हर्षित यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.
टर्निंग पॉईंट -
१८ व्या ओव्हरमध्ये सामना भारताच्या दिशेने झुकला. ओमानला १४ चेंडूंमध्ये ४० धावांची गरज होती. कलीम चांगल्या फॉर्ममध्ये होता. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर कलीमने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पंड्या धावात गेला आणि त्याने हवेत एका हाताने शानदार कॅच घेतला. हार्दिकच्या कॅचमुळे ओमान बॅकफूटवर गेला आणि सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने वळला.
शेवटच्या ओव्हर्समध्ये धावांची गरज असताना ओमानच्या फलंदाजांवर दबाव आला. हा दबाव सहन न झाल्याने ओमानचा २१ धावांनी पराभव झाला. भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये सलग गट सामने जिंकत सुपर ४ मध्ये स्थान मिळवले. सलग ३ सामने जिंकल्याने हा विजय भारतासाठी खास होता. भारतासारख्या बलाढ्य संघाला टक्कर दिल्याने क्रिकेट विश्वात ओमानच्या संघाचेही कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.