रोहित कदम, साम टीव्ही
फुटबॉल जगतातील सर्वात प्रतिष्ठेच्या फिफा विश्वचषकाचा थरारक अंतिम सामना आज मध्यरात्री रंगणार आहे... फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा फिफा विश्वचषक 2026 चा ऐतिहासिक अंतिम सामना न्यूयॉर्कमधील न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गतविजेता अर्जेंटिना आणि युरो चॅम्पियन स्पेन अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. 39 वर्षांचा लिओनेल मेस्सी आणि 19 वर्षीय लॅमिन यामाल यांच्या कामगिरीवर फुटबॉल चाहत्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान, या सामन्यातील प्रमुख 3 गोष्टींवर एक नजर टाकूयात...
अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद राखण्याची संधी
स्पेन 2010 नंतर दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे, डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाकडे चौथ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची आणि सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप आपल्या नावावर करण्याची संधी असेल. विशेष बाब म्हणजे, विजय मिळवल्यास अर्जेंटिनाचा संघ 1938 मध्ये इटली तर 1962 मध्ये ब्राझीलनंतर सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा तिसरा संघ ठरू शकतो.
19 वर्षांपूर्वी मेस्सीने यमालला कडेवर घेतलं होतं
या अंतिम सामन्यातील सर्वात मोठा क्लायमेक्स लिओनेल मेस्सी आणि लामिन यमाल हे आहेत. मेस्सी अर्जेंटिनाचा सुपर स्टार आहे, तर यमाल स्पेनचा युवा खेळाडू आहे. मेस्सी स्पेनमधील बार्सिलोना क्लबसाठी खेळत होता. त्यावेळेस म्हणजेच 19 वर्षांपूर्वी बार्सिलोनाच्या एका चॅरिटी फोटोशूटमध्ये मेस्सीने तीन महिन्यांच्या यमालला एका जाहीरातीसाठी अंघोळ घातली होती. 2007 मध्ये कॅम्प नोऊच्या ड्रेसिंग रूममध्ये चॅरिटी कॅलेंडरच्या फोटोशूटदरम्यान 20 वर्षांच्या लिओनेल मेस्सीने 6 महिन्यांच्या लामिन यामलला कडेवर घेतले होते. विशेष म्हणजे आता दोघेही वर्ल्ड कप फायनलमध्ये आमनेसामने असतील.
स्पेनचा बचाव विरुद्ध अर्जेंटिनाची आक्रमकता
अंतिम सामन्यात स्पेनच्या बचावफळीत आणि अर्जेंटिनाच्या आक्रमणात सर्वात मोठी लढत होईल. संपूर्ण विश्व चषकात स्पेनने फक्त एक गोल स्वीकारला आहे, तर अर्जेंटिनाने 19 गोल केले आहेत. त्यामुळे साहजिकच आजच्या लढतीत स्पेनचे संरक्षण भेदणे हेच अर्जेंटिनासमोर मुख्य आव्हान असेल... तर दुसरीकडे, स्पेनच्या रोड्री, कुबार्सी आणि कुकुरेला यांच्यावर मेस्सीला रोखण्याची जबाबदारी असेल, तर अर्जेंटिनाच्या आशा मेस्सी, ज्युलियन अल्वारेझ आणि एन्झो फर्नांडिस यांच्यावर अवलंबून असतील.
मेस्सीची विजयी घोडदौड रोखून विश्वविजेतेपदाचा मुकुट खेचून आणण्यात स्पेनचा लामिन यमाल यशस्वी होणाऱ? की मेस्सीची जादू पुन्हा चालणार हे पाहणं महत्त्वाचं असेल...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.