

देशातील १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या काही भागांत पावसाचा अंदाज
उत्तर भारतातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहू शकतात.
देशातील १६ राज्यांमध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलीय. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, लक्षद्वीप आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, तर वाऱ्याचा वेग काही ठिकाणी ६० किमी प्रतितास इतकाही असू शकतो.
पश्चिम राजस्थानमध्ये वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र १४ नोव्हेंबर रोजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत त्याचे रूपांतर 'डिप्रेशन'मध्ये (कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात) आणि १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.
यासह १५ नोव्हेंबरपासून वायव्य भारतावर एक नवीन 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' (पश्चिमेकडील विक्षोभ) सक्रिय होऊ शकतो, ज्यामुळे डोंगराळ राज्यांमधील हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
शनिवारी उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील काही क्षेत्रांत हलका ते विखुरलेला पाऊस पडू शकतो. हे हवामान १५ नोव्हेंबर रोजीही कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, १४ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात पावसाची कोणतीही शक्यता नाहीये.
१४ नोव्हेंबर रोजी बिहारमधील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यात पावसाबाबत कोणताही अंदाज किंवा विशेष इशारा दिलेला नाही. तसेच वादळ, विजांचा कडकडाट किंवा जोरदार वारे वाहण्याचीही कोणतीही शक्यता नाही. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या कालावधीत बिहारसह पूर्व भारतातील अनेक भागांत हवामानात कोणतेही लक्षणीय बदल अपेक्षित नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, ज्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.
शनिवारी दिल्लीत आकाश काही प्रमाणात ढगाळ राहील. सकाळच्या वेळी बहुतेक भागांत धुरके आणि हलके धुके असेल, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिल्लीत कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असू शकते. किमान तापमान सामान्यपेक्षा ३.१ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे, सध्या तरी दिल्लीत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता नाही.
१४ नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या पश्चिम भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम राजस्थानच्या काही भागांत हलका ते विखुरलेला पाऊस पडू शकतो. या काळात हवामानात वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
शनिवारी हिमाचल प्रदेशच्या काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवलाय. १३ नोव्हेंबर रोजी काही भागांत मेघगर्जनेसह विजा चमकण्याचीही शक्यता आहे. मात्र, १४ नोव्हेंबरसाठी मुसळधार पाऊस किंवा जोरदार वादळाबाबत कोणताही इशारा देण्यात आला नाहीये.
१४ नोव्हेंबर रोजी जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दोन्ही प्रदेशांतील काही भागांत हलका ते विखुरलेला पाऊस पडू शकतो. १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत असू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.