Uttar Pradesh Fire Accident : उत्तरप्रदेशातील फिरोजाबादमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. फिरोजाबादमधील जसराना येथील एका इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर ३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी (२० नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. (Latest Marathi News)
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग (Fire Accident) लागली. क्षणार्धात या आगीने रौद्ररुप धारण केलं. आगीची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. फिरोजाबादचे एसपी (Police) आशिष तिवारी यांनी सांगितले की, जसराना भागातील पदम शहरात ही घटना घडली.
येथील एका इमारतीत इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचं दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री या दुकानात असलेल्या इन्व्हर्टरमध्ये शॉर्ट सर्किट झाले. ज्याने भीषण आगीचे रूप धारण केले. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये ४ मुलांचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचावरकार्य सुरू करण्यात आलं आहे.
इमारतीत आणखी काही नागरिक अडकले आहेत का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाला आग लागल्याने आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारतीला वेढले. या भीषण अपघातात जीव गमावलेले कुटुंब त्याच इमारतीत राहत होते.
मुख्यमंत्री योगींनी जाहीर केली मदत
दरम्यान, उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिरोजाबाद येथे झालेल्या भीषण अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. यासोबतच सीएम योगी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.