उत्तर प्रदेश भीषण अपघातामध्ये चौघांचा मृत्यू
बाराबंकीमध्ये घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाला डंपरने चिरडले
उकाड्यामुळे बाहेर झोपलेल्या कुटुंबाचा करुण अंत
अपघातानंतर डंपर चालक फरार
उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघताची घटना समोर आली आहे. भरधाव डंपरने एकाच कुटुंबातील ५ जणांना चिरडलं. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाले. बाराबंकी जिल्ह्यातील फतेहपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झांसा गावात ही घटना घडली. अपघातामध्ये जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली. झांसा गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे या गावात राहणाऱ्या नीरज यांच्या कुटुंबातील सदस्य घराबाहेर झोपले होते. त्याचवेळी रस्त्यावरून अनियंत्रितपणे जाणाऱ्या एका डंपरने झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना चिरडले. या अपघातामुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण होते. घटनास्थळावरील किंचाळ्या आणि रडण्याच्या आवाजाने हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या आरोपी डंपर चालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे एक कुटुंब त्यांच्या घराबाहेर रस्त्याच्या कडेला झोपले होते. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने या सर्वांना चिरडले. चालकाचा डंबरवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. डंपरने आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली आणि नंतर घराबाहेर झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना चिरडले. किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामध्ये नीरज (३५ वर्षे) आणि त्याची मुलं अनुराग (१३ वर्षे), अंशु (६ वर्षे) आणि अंशिका (१० वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आरती (३५ वर्षे) यांची प्रकृती गंभीर आहे. त्या महिलेला लखनौ येथील डॉ. राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी डंपर जप्त केला आहे. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.