अभिनेता जोसेफ विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
चेन्नईमध्ये भव्य शपथविधी सोहळा पार पडला.
विजय यांनी १२१ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध केले.
राहुल गांधींसह अनेक दिग्गज नेते कार्यक्रमाला उपस्थित होते.
तामिळनाडूच्या राजकारणात अखेर मोठी घडामोड घडली असून अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय (TVK Leader CM Joseph Vijay) यांनी आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत इतिहास रचला आहे. अनेक दिवस सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीके सरकार अधिकृतपणे सत्तेवर आले आहे. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात हा शपथविधी सोहळा पार पडला. विजय यांच्या शपथविधीसाठी राज्यभरातून हजारो समर्थक चेन्नईत दाखल झाले होते.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेवरून मोठा राजकीय तिढा निर्माण झाला होता. मात्र अखेर विजय यांनी १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सादर करून बहुमत सिद्ध केले. त्यानंतर राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी अधिकृत निमंत्रण दिले. आज सकाळी १० वाजता विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेताच उपस्थित समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील अनेक राजकीय नेते आणि मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील विशेष उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या शपथविधीची राजकीय पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे. तसेच अभिनेत्री त्रिशा कृष्णनन (Trisha Krishnan) देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. विजय यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होत असल्याची भावना टीव्हीके समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विजय यांच्यासोबत आणखी नऊ मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये एन. आनंद, आधव अर्जुना, डॉ. के.जी. अरुणराज, के.ए. सेंगोट्टय्यान, पी. व्यंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टीके. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्थना यांचा समावेश आहे. नवीन सरकार राज्यात मोठे बदल घडवेल आणि विकासाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.