

चंद्र कुमार बोस यांनी नव्या आझाद हिंद पार्टीची घोषणा
सुभाषचंद्र बोस यांच्या पणतूंचा नवा राजकीय पक्ष
चंद्र कुमार बोस भाजप आणि तृणमूल काँग्रेसपासून फारकत
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजप आणि तृणमूल काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे. चंद्र कुमार घोष यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आ. ते आपल्या पक्षाचे नाव 'आझाद हिंद पार्टी' असे ठेवणार आहेत. (Chand Kumar Bose Announces New Azad Hind Party Inspired By Netaji’s Ideals)
बोस यांनी सांगितले की, हा राजकीय मंच उभारण्याची प्रेरणा त्यांना अलीकडील Gen-Z चळवळीतून मिळालीय. हा नवीन पक्ष प्रामुख्याने तरुणांना सामावून घेईल आणि नेताजींच्या धर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांवर आधारित राजकारण केले जाईल, असं त्यांनी घोषणा करताना म्हटलंय.
चंद्र कुमार बोस २०१६ मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते. भाजपमध्ये ते जवळपास सात वर्षे राहिले होते. नेताजींचे विचार पुढे नेण्यासाठी 'आझाद हिंद मोर्चा' स्थापन केला जाईल आणि त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आपल्याला दिली जाईल, असे आश्वासन भाजप नेतृत्वाने त्यांना दिले होते. मात्र सात वर्षे वाट पाहूनही असा कोणताही मंच स्थापन न झाल्यामुळे, त्यांनी यासंदर्भात भाजप नेतृत्वाकडे विचारणा केली होती, मात्र उत्तर मिळालं नाही.
चंद्र कुमार बोस हे विधानसभा निवडणुकांपूर्वीच ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. चंद्रा बोस यांच्या मते, तिथे नेताजींच्या आदर्शांवर आधारित काम करण्याची संधी मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र, नंतर वैयक्तिक कारण देत त्यांनी तृणमूलची साथ सोडली. चंद्रा बोस यांचा आरोप आहे की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्वच पक्ष भ्रष्टाचार आणि खालच्या पातळीच्या राजकारणात गुंतलेत. त्यांच्यामते, शिक्षण, आरोग्य, पायभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रात भ्रष्टाचार होत असल्यानं आपण निराश झालो होतो.
स्वातंत्र्यानंतर ८० वर्षांनी देशातील तरुण पुन्हा एकदा आपली ऊर्जा आणि असंतोष व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते, अलीकडील Gen-Z चळवळ हे दर्शवते की तरुणांना त्यांच्या हक्कांचा पुरस्कार करण्यासाठी एका राजकीय व्यासपीठाची आवश्यकता आहे. त्यांनी पुढे सांगितले की, नेताजींच्या 'आझाद हिंद फौजे'पासून प्रेरणा घेऊन स्थापन झालेला 'आझाद हिंद पक्ष' तरुणांना असे व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असं चंद्र कुमार बोस यांनी नवा पक्षाची घोषणा करताना म्हणाले.